हाय ब्लड शुगर असो वा तोंडाची दुर्गंधी आवळा ठरतो यावर रामबाण उपाय; कसा ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:31 PM2023-10-25T13:31:08+5:302023-10-25T13:41:43+5:30
Health Tips : डाएट एक्सपर्ट हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस सेवन करण्याचा सल्ला देतात.
Health Tips : हिवाळ्याला आता सुरू झाली आहे. या दिवसांमध्ये वेगवेगळी फळं येतात. त्यात आवळाही आहे. आवळ्याला प्राचीन काळापासून आयुर्वेदात औषधी म्हणून महत्व आहे. आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने आवळा महत्वाचा ठरतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी आवळा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळेच डाएट एक्सपर्ट हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस सेवन करण्याचा सल्ला देतात. केवळ डायबिटीसच नाही तर इतरही अनेक समस्यांपासून आवळा तुमचा बचाव करतो.
मॉर्निंग सिकनेस
प्रेग्नन्सीदरम्यान सकाळी झोपेतून उठल्यावर महिलांना फार त्रास होतो. याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आवळ्याचं सेवन करू शकता. सकाळी जर चक्कर किंवा उलटीसारखं वाटत असेल तर आवळ्याचा एक कच्चा तुकडा किंवा सुकलेला आवळा चघळा.
डायजेशन
पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. अनेकजण जेवण केल्यावर आवळा खातात. तुम्हाला जर अपचनाची समस्या असेल तर आवळ्याचे 2 ते 3 तुकडे खावेत. हा पचनासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा चांगला उपाय आहे. आवळा पचनक्रियेसाठी आवश्यक गॅस्ट्रिक लिक्विड निर्माण करण्यास मदत करतो.
तोंडाची दुर्गंधी
ज्या लोकांना नेहमी तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांनी नेहमी आवळा खावा. सुकलेला आवळा नेहमी सोबत ठेवावा. जेव्हाही तोडांची दुर्गंधी येत असेल तेव्हा आवळ्याचे 2 तुकडे चघळावे. यातील अॅंटी-इफ्लेमेटरी तत्व तोंडाच्या दुर्गंधीसाठी जबाबदार बॅक्टेरिया नष्ट करतात.
सी व्हिटॅमिन
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, आवळ्यामध्ये जितकं व्हिटॅमिन सी आढळतं तितकं इतर कोणत्याही फळांमध्ये आढळत नाही. व्हिटॅमिन सी हे केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यास अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे आवळ्याच्या सेवनानं त्वचा आणि केसांना फायदा होतो. अशा बहुगुणी आवळ्याच्या सेवनानं तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत होते.