कोरोनानंतर आता अँथ्रेक्सचा धोका, केरळमध्ये या भयानक आजाराचा उद्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:19 PM2022-06-30T18:19:11+5:302022-06-30T18:22:13+5:30
ज्या केरळात देशातील कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळून आलं होतं, त्याच केरळात अँथ्रेक्सचा उद्रेक झाला आहे. कित्येक जीवांचा या आजाराने बळी घेतला आहे.
जगभरात कोरोनाव्हायरस अद्यापही थैमान घालतो आहे (Coronavirus). त्यात मंकीपॉक्स आणि इतर काही आजारांचंही संकट आलं आहे. अशात आता आणखी एका आजाराने दहशत निर्माण केली आहे. हा आजार म्हणजे अँथ्रेक्स. ज्या केरळात देशातील कोरोनाचं पहिलं प्रकरण आढळून आलं होतं, त्याच केरळात अँथ्रेक्सचा उद्रेक झाला आहे. कित्येक जीवांचा या आजाराने बळी घेतला आहे (Anthrax in Kerala).
केरळच्या अथिरापल्ली वनक्षेत्रात रानडुकरांमध्ये अँथ्रेक्सचं संक्रमण आढल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली. या संसर्गामुळे कित्येक डुकरांचा मृत्यूही झाला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं की, अथिरापल्ली वनक्षेत्रात रानडुकरांमध्ये अँथ्रेक्स असल्याचं निदान झालं आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ पावलं उचलली जात आहे. हा मातीत नैसर्गिकरित्या असलेला एक बॅक्टेरिया आहे. याच्या संपर्कात येताच प्राण्यांना याचा संसर्ग होतो.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जंगली मृत डुकरांना दफन करणाऱ्या आणि काढणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवलं जात आहे, त्यांना आवश्यक ते उपचारही दिले जात आहे. जर या लोकांमध्ये संक्रमण पसरलं तर इतर तो जास्त पसरण्याची शक्यता आहे.