कॅन्सर रुग्णांसाठी महत्त्वाचं संशोधन, शास्त्रज्ञांनी शोधल्या अँटी कॅन्सर अँटीबॉडीज, उपचारात वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 04:44 PM2021-12-28T16:44:11+5:302021-12-28T16:47:18+5:30
ब्रिटनमधल्या (UK) काही शास्त्रज्ञांनी अँटी कॅन्सर अँटीबॉडीज (Anti cancer antibodies) विकसित केल्या आहेत. या अँटीबॉडीज केमोथेरपीचे साइड इफेक्ट्स कमी करतात. तसंच, या अँटीबॉडीज ट्यूमर पुन्हा विकसित होण्याचा धोकाही २५ टक्क्यांपर्यंत कमी करतात, असं चाचण्यांमध्ये आढळलं आहे.
कॅन्सर (Cancer) हा असा विकार आहे ज्यावर अद्याप प्रभावी उपचार (Cancer treatment) सापडलेला नाही. सध्या उपलब्ध असलेल्या उपचारांनी कॅन्सरच्या रुग्णांचं आयुष्य थोडं-फार वाढवायला नक्कीच मदत झाली आहे; मात्र तो पूर्णतः बरा होत नाही. केमोथेरपी या उपचार पद्धतीमुळे कॅन्सर काहीसा नियंत्रणात येत असला, तरी त्या पद्धतीने साइड इफेक्ट्स (Cancer treatment side effect) बरेच आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधल्या (UK) काही शास्त्रज्ञांनी अँटी कॅन्सर अँटीबॉडीज (Anti cancer antibodies) विकसित केल्या आहेत. या अँटीबॉडीज केमोथेरपीचे साइड इफेक्ट्स कमी करतात. तसंच, या अँटीबॉडीज ट्यूमर पुन्हा विकसित होण्याचा धोकाही २५ टक्क्यांपर्यंत कमी करतात, असं चाचण्यांमध्ये आढळलं आहे.
NHS या ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेने ब्लड कॅन्सरच्या रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेतल्या आहेत. पॉलिवी असं त्या औषधाचं नाव ठेवण्यात आलं आहे. कॅन्सरच्या अॅडव्हान्स्ड स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना ही नवी ट्रीटमेंट लाभदायक ठरू शकेल, असा विश्वास ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे (Oxford University Hospital) कन्सल्टंट हिमॅटोलॉजिस्ट डॉ. ग्रॅहम कोलिन्स यांनी व्यक्त केला आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलेल्या वृत्तानुसार ही नवी ट्रीटमेंट (New Treatment) जुन्या ट्रीटमेंटच्या तुलनेत खूप चांगली असल्याचा दावा केला जात आहे.
या ट्रीटमेंटमध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम प्रोटीनचा (Artificial Protein) वापर केला आहे. हे प्रोटीन कॅन्सरपीडित रुग्णाच्या शरीरात जाऊन ट्यूमर्सचा (Cancerous Tumours) शोध घेतं आणि केमोथेरपीचं औषध त्या ट्यूमर्सपर्यंत पोहोचवून त्यांना नष्ट करतं. या औषधाला ट्रोजन हॉर्स डॉग (Trojan Horse Dog) असं नावही देण्यात आलं आहे. या औषधामुळे शरीरातल्या चांगल्या पेशींना धोका पोहोचत नाही, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. कारण या अँटीबॉडीजमध्ये (Anti Cancerous Antibodies) केमोथेरपीचा डोसची (Chemotherapy Dose) मात्रा कमी असते. त्यामुळे डॉक्टर्स रुग्णांना हाय डोसची औषधं भीतीविना देऊ शकतील.
यापूर्वीचं संशोधन ब्लॅडर कॅन्सरच्या रुग्णांवर करण्यात आलं होतं. त्या संशोधनात असं आढळलं होतं, की ही ट्रीटमेंट अशा रुग्णांच्या मृत्यूचा धोका एक तृतीयांशपर्यंत कमी करू शकते. त्याच ट्रीटमेंटच्या आताच्या चाचण्या ब्लड कॅन्सरच्या रुग्णांवर करण्यात आल्या होत्या. पॉलिवी या औषधात अशा प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत, की ज्या शरीराची इम्युन सिस्टीम नैसर्गिकरीत्या तयार करते.
शास्त्रज्ञ म्हणतात, की कॅन्सरच्या काही रुग्णांमध्ये केमोथेरपीचा परिणाम योग्य तऱ्हेने होत नाही. त्यामुळे अँटी कॅन्सर अँटीबॉडीज ट्रीटमेंट प्रभावी ठरू शकते. ती किती प्रभावी आहे, हे समजून घेण्यासाठीच आताच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून असं आढळलं, की ज्यांच्यावर या चाचण्या घेण्यात आल्या, त्यांना कॅन्सर परत होण्याचा धोका सुमारे २५ टक्के कमी झाला. तसंच, केमोथेरपीनंतर होणारे साइड इफेक्ट्सदेखील कमी झाले. एखाद्या व्यक्तीला या इलाजानंतर दोन वर्षांपर्यंत कॅन्सर परत झाला नाही, तर त्यांना कॅन्सर होण्याचा धोका जवळपास नाहीच, असा दावा करण्यात आला आहे.