भूक गायब ..करायचं काय
By admin | Published: April 3, 2017 04:54 PM2017-04-03T16:54:31+5:302017-04-03T16:54:31+5:30
जेवणाची वेळ झालीये पण पोटात तर भूकच नाही. याला काय म्हणायचं आणि भूक लागण्यासाठी करायचं काय?
जेवण म्हणजे नित्याची बाब. पण कधी कधी आपल्या लक्षात येतं की जेवणाची वेळ झालीये पण पोटात तर भूकच नाही.आणि असं एकदा, दोनदा नाहीतर अनेकदा होतयं. हल्ली हल्ली तर रोजचं. पण मग असं होत असेल तर आपल्याला भूक न लागण्याचा आजार तर झालेला नाही ना!
पण आजार म्हटलं तर लगेच दचकून जावू नका. यासाठी लगेच दवाखान्यात जावून नंबर लावण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय करूनही आपण आपल्या पोटातल्या भुकेला परत बोलावू शकतो.
भूक वाढेल कशी?
* दिवसभर सारखं सारखं खाण्याची सवय असेल तर जेवणाच्या वेळी भूक लागणारच नाही. त्यासाठी तोंडावर ताबा ठेवून लंघन करायचं. काही काळ काही खाल्लंच नाही तर आपोआप भूक वाढते.
* पोट नीट साफ होत नसेल तरी भूक लागत नाही. म्हणून मधून मधून पोट साफ राहण्यासाठी एरंडेल तेलासारख्या आपल्या आजीच्या काळातल्या औषधांचा उपयोग अवश्य करावा. काळ्या मनुका, सुकी अंजीरं यासारखे पदार्थ दिल्यास पोट साफ रहातं आणि भूकही ताळ्यावर येते.
* भूकेसाठीचं औषध शोधायला खूप दूर जाण्याची गरज नाही. स्वयंपाकघरातला हिंग यासाठी उत्तम आहे. पोटात जंत असल्यामुळेही व्यवस्थित भूक लागत नाही. पोटातल्या जंतावर हिंग व्यवस्थित काम करतो. हिंग तूपात तळून खायला दिल्यास भूक वाढते अन पोटही साफ राहतं.
* हिंगापासून बनवलेलं हिंगाष्टक चूर्ण नावाचं औषध बाजारात सहज उपलब्ध आहे. गरम पाण्याबरोबर, ताकामध्ये घालून किंवा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूप आणि हिंगाष्टक चूर्ण खाल्ल्यास ाांगली भूक लागून पचनही व्यवस्थित होतं.
* घरात असणारे सुंठ, मिरी,दालचिनी, पिंपळी यासारखे अनेक पदार्थ हे भूक वाढवणारे आहेत. या पदार्थाचे चूर्ण करुन मधाबरोबर चाटल्यास भरपूर भूक लागते.
* ताटातला चटणी कॉर्नर हा फक्त तोंडी लावण्यापुरताच नसतो. तर त्यामुळेही भूक उत्तम लागू शकते. फक्त त्यासाठी चटण्या तशा हव्यात. जशी लसूण, पूदिना, आलं या पदार्थांचा वापर नित्य आहारात असायला हवा म्हणून त्यांची चटणी किंवा फोडणीच्या स्वरुपात वापर केल्यास चांगली भूक लागते. तीळाची चटणी, पुदिन्याची चटणी, भोपळ्याच्या सालीची चटणी, कढीपत्त्याची चटणी यासारख्या चटण्या चव वाढवण्याची, पचनास मदत करण्याची आणि पोटातली जंतांचा खात्मा करण्याची तिहेरी भूमिका निभावतात. अशा चटण्या खाण्याची सवय मोठ्यांपासून लहानांनाही असायला हवी.
* जेवणामध्ये साजूक तूप आणि जेवणानंतर ताक हे दोन्ही पदार्थ असतील तर भूक नक्की वाढते.
* गरम पोळीला तूप लावून त्यावर लसूण किंवा पुदिन्याची चटणी लावून रोल करून खाल्ल्यास जीभेला चव येते आणि पोटातली भूक जागी होते.
* आपण नुसते बसून काम करणारे असू किंवा आपली बैठी जीवनशैली असेल तर मग जेवणाच्या वेळेस भूक न लागणं हे सवयीचं होवू शकतं. ही सवय मोडण्यासाठी व्यायाम करण्याची चांगली सवय मदत करू शकते. नाही जास्त तर किमान रोज १२ सूर्यनमस्कार घालावेत. भरपूर चालावं. भूक न लागण्याची सवय जर मुलांमध्ये असेल तर त्यांनाही व्यायामासोबत दिवसातून किमान एक तास मैदानी खेळ खेळण्यास उद्युक्त करावं. या अशा सवयीनं शरीर हलकं फुलकं होण्यासोबतच पोटातली भूकही वाढते.
* रात्री उशिरा जेवणाच्या ऐवजी सांयकाळी लवकर जेवावं.
*टी.व्ही. पाहात किंवा मोबाईल पाहात जेवण न करणं जास्त चांगलं.
* जेवताना स्वत:चं मन प्रसन्न हवं. आपल्या जेवायला बसण्याची जागा स्वच्छ आणि प्रसन्न हवी. अशा प्रसन्न वातावरणात पोटातली भूक जागी होतेच.
* जेवण झाल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करुन अर्धा किंवा एक चमचा खावं. याचा उपयोग पुढच्या भुकेसाठी होतो.पोटातले गॅसही यामुळे जातात.