मुलांना चष्मा अभ्यासामुळे लागतोय की मोबाइलमुळे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:51 AM2023-12-17T10:51:21+5:302023-12-17T10:51:55+5:30
सतत मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे त्याची मुलांना सवय जडत आहे. काही संदर्भात पालकांनी मुलांना मोबाइल न दिल्यास चिडचिड, राग येण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
मुंबई : पूर्वी मुलाला चष्मा असेल तर तो फार अभ्यास करतो, असे म्हटले जात असे. मात्र, अलीकडे मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी एक वर्षाच्या मुलालाही चष्मा दिसतो. शिक्षणासह मनोरंजनासाठी मुलांमध्ये मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे. त्यामुळे अति अभ्यासामुळे मुलांना चष्मा लागतो आहे की, मोबाइलमुळे असा प्रश्न पालकांना सतावतो.
चिडचिड, राग वाढला
सतत मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे त्याची मुलांना सवय जडत आहे. काही संदर्भात पालकांनी मुलांना मोबाइल न दिल्यास चिडचिड, राग येण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शिक्षणासाठी मुलांच्या हाती सुरुवातीला मोबाइल दिला जातो. त्यातून मुले शिक्षणावर आधारित व्हिडीओ बघतात. त्यानंतर मात्र मुले सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. खासकरून यू-ट्यूब, फेसबुकसह तत्सम ॲपवरील व्हिडीओ बघण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. सतत मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप बघण्याने विकार वाढल्याचे आढळून आले आहेत.
मुलांमध्ये मोबाइलचे आकर्षण का?
सामान्यपणे मुले रंग, आकर्षित चित्र किंवा एखादी विशिष्ट वस्तू पाहून आकर्षित होतात. कार्टून, चित्रासह निघणारा प्रकाश त्यांना खूप आवडतो. यामुळे मुले मोबाइलला जवळ करत आहेत. एका खेळण्याप्रमाणे एकरूप होत असून यातून त्यांना त्याची सवय जडत आहे. मोबाइलमधील आवाज आणि स्पर्श मुलांना खूप आवडतो. यामुळे शालेय विद्यार्थ्यांत मोबाइलचे आकर्षण वाढत आहे.
तज्ज्ञ सांगतात आऊटडोअर ॲक्टिव्हिटी महत्त्वाची
मुलांचे मैदानी खेळ, व्यक्तिमत्त्व विकासाचे इतर छंद बंद झाले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणेही कमी झाले आहे. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे. याचा परिणाम दृष्टीवर होतोय. पालकांनी मुलांच्या दृष्टीदोषाकडे वेळीच लक्ष द्यावे. शाळेतही नियमितपणे नेत्र तपासणी झाली पाहिजे. मायनस नंबर असणाऱ्यांसाठी मल्टिफोकल चष्मे आले आहेत. त्यामुळे दृष्टीदोष वाढत नाही. मुलांना शाळेत टाकतानाच नेत्र तपासणी महत्त्वाची ठरू शकते.
मुलांना चष्मा लागण्याची इतर कारणे काय?
आनुवंशिक : आनुवंशिक कारणामुळे म्हणजे आई-वडिलांना चष्मा असेल तर मुलांमध्येही चष्मा लागण्याची शक्यता वाढते.
आहार : सकस आहाराच्या अभावानेही दृष्टीदोष होऊ शकतो.
टीव्ही : टीव्ही पाहण्याचे प्रमाण मुलांमध्ये अधिक आहे. त्यामुळे टीव्हीदेखील चष्मा लागण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
उपाय काय?
मोबाइल, टॅब, संगणक, लॅपटॉप अशा डिव्हाइसचा योग्य आणि थोड्या वेळेसाठीच वापर करावा.
मोबाइल, टॅब, संगणक, टीव्ही लांबून अंतर ठेवून पाहावे.
अभ्यासाव्यतिरिक्त लहान मुलांनी मैदानी खेळावर लक्ष द्यावे.
पौष्टिक आणि चौरस आहार घ्यावा.
सकाळच्यावेळी स्वच्छ सूर्यप्रकाश घ्यावा. वृत्तपत्र वाचन, लेखन, चित्रकला, संगीत, नृत्य, कला इ. छंद जोपासावे.