वजन कमी करण्यासाठी कॉर्न फ्लेक्स हा पौष्टिक नाश्ता आहे?; जाणून घ्या खरं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 02:04 PM2018-12-07T14:04:23+5:302018-12-07T14:05:10+5:30
वजन कमी करत असताना पौष्टिक नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, नाश्ता दणकून केला पाहिजे, असं ऐकायला मिळतं. परंतु......
वजन कमी करण्याचं 'मिशन' हाती घेतलेली बहुतांश मंडळी सकाळच्या नाश्त्यात कॉर्न फ्लेक्स खात असल्याचं आपणही पाहिलं असेल. उपमा, पराठा, पुरी, पॅन केक फार 'हेवी' होतं बुवा, असं म्हणत ते कॉर्न फ्लेक्सवर दूध ओतून घेतात. हे मिश्रण आरोग्यदायी, पौष्टिक असल्याचं मानलं जातं. हा नाश्ता बनवायलाही अगदी सोपा असल्यानं महिलावर्गाचीही त्याला पसंती असते. परंतु, दुधासोबत कॉर्न फ्लेक्सचा नाश्ता वजन घटवण्यासाठी खरंच कितपत उपयुक्त आहे?, यावर तज्ज्ञांचं मत वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
कॉर्न फ्लेक्स हलकेफुलके असतात, त्यात फॅट्सचं प्रमाण कमी असतं आणि पूर्णान्न मानल्या जाणाऱ्या दुधासोबत ते खाल्ले जातात, म्हणून हा आदर्श आणि लोकप्रिय नाश्ता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, या लो-फॅट्स पदार्थातील साखरेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. नेमका हा गोडवाच आपल्यासाठी कडवट ठरू शकतो. विशेषतः, वजन कमी करणाऱ्यांसाठी ही साखर नक्कीच त्रासदायक ठरू शकते.
कॉर्न फ्लेक्सचा नाश्ता आपल्याला मधुमेहाकडेही नेऊ शकतो, याकडे आहारतज्ज्ञ लक्ष वेधतात. कॉर्न, फ्रुक्टोस आणि कॉर्न सिरप वापरून हे फ्लेक्स बनवले जातात. त्यात ग्लायसेमिकचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन वाढू शकतं आणि ते वजन वाढण्यासाठीही कारणीभूत ठरतं. काही जण कॉर्न फ्लेक्सवर मध किंवा साखर घालून खातात. हा 'दुग्धशर्करा योग' अधिकच महाग पडू शकतो. याउलट, सकाळच्या नाश्त्यातून शरीरात कमी साखर कशी जाईल, हे वजन कमी करणाऱ्यांनी पाहायला हवं.
वजन कमी करत असताना पौष्टिक नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, नाश्ता दणकून केला पाहिजे, असं ऐकायला मिळतं. परंतु, खरं गणित कॅलरीजचं आहे. त्या जर तुम्ही योग्य प्रमाणात घेत असाल तर तुम्ही सकाळचा नाश्ता करता की टाळता किंवा काय जेवता, हे फार महत्त्वाचं राहत नाही. मॅटाबॉलिजमवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण, कॉर्न फ्लेक्स हा आदर्श नाश्ता असू शकत नाही, हे मात्र नक्की. वजन कमी करणाऱ्यांसाठी तर अजिबातच नाही, असं तज्ज्ञ आवर्जून सांगतात.