पालकच मुलांना आत्महत्येसाठी भाग पाडताहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 07:59 AM2023-05-23T07:59:05+5:302023-05-23T07:59:24+5:30
संशोधन : कमी वयात मोबाईल दिल्याने मुले अडकली मानसिक समस्यांच्या गर्तेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या प्रत्येक घरातील मुलांना फोनचे अत्यंत वाईट व्यसन लागले आहे. स्मार्टफोनमुळे मुले गुंतून राहतात असे अनेक पालकांना वाटत असेल तर ते चुकीचे ठरवणारा एक अहवाल समोर आला आहे. कमी वयातच लहान मुलांच्या हातात फोन दिल्यामुळे त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलांनी लहान वयातच स्मार्टफोनचा वापर केला आहे, त्या सर्वांनाच तरुण वयात आत्महत्या, इतरांबद्दलचा तीव्र राग, मनातील संभ्रम अशा अनेक समस्या अधिक दिसून आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाइल देताना दहावेळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अहवाल कुणाचा?
सॅपियन लॅब्सने ४० पेक्षा अधिक देशांतील ४ हजार तरुण आणि २७,९६९ प्रौढ व्यक्तींना सहभागी करून ‘एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन/टॅबलेट अँड मेंटल वेलबिंग आउटकम’ नावाचा अहवाल तयार केला आहे. अहवालात भारतीय तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
काय आहे अहवालात?
सर्वेक्षणातील किमान ७४ टक्के महिला अशा होत्या ज्यांनी वयाच्या ६ व्या वर्षी पहिला स्मार्टफोन वापरला, त्या महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आढळल्या, तर १० वर्षे वय असताना ज्यांनी मोबाईल वापरला त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या ६१ टक्केपर्यंत कमी झाल्या होत्या. १५ आणि १८ वयात स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ५२ आणि ४६ टक्के होते. पुरुषांमध्येही हा आकडा सारखाच होता, पण त्यांच्यात ही समस्या थोडी कमी होती. स्मार्टच्या अतिवापरामुळे मुले एकमेकांशी संवाद साधत नाहीत तसेच त्यांचे सामाजिक भान, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमताही कमी होते.
मुले काय पाहतात यावर लक्ष ठेवता? : लहान मुले नेमके काय पाहतात यावर सतत लक्ष ठेवा. यासाठी ब्राउझिंग इतिहासाचा मागोवा घ्या. जर काही चुकीचे घडत असेल तर त्यावर लक्ष ठेवून कृती करा. इंटरनेटचा चांगला वापर कसा करायचा हे शिकवा.
अहवालात आई-वडिलांना खास सूचना
फोन कधी द्यावा? : पालकांनी त्यांच्या मुलांना किमान १८ वर्षे होईपर्यंत तरी स्मार्टफोन देण्याची घाई करू नये. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम कमी होईल आणि ते स्मार्टफोन वापराशी संबंधित जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेतील.
गप्पा मारा : मुलांना नाती काय असतात हे शिकवण्यासह
इतरांशी सुसंवाद साधायला प्रोत्साहित करा. स्मार्टफोनमधील आभासी मित्रांपेक्षा आजूबाजूला असलेल्या मित्र कुटुंबासह वेळ घालवणाऱ्या गोष्टी करा. त्यांच्याबरोबर एकत्रितपणे खेळा.
फोन देऊन चूक केली असेल तर...: १८ पेक्षा कमी वयाच्या मुलाकडे स्फार्टफोन देत तुम्ही चूक केली असल्यास मुलाने फोन किती वेळ वापरावा याची मर्यादा ठरवून घ्या. त्यांना वाचन, छंद किंवा मैदानी खेळ यांत गुंतवणूक ठेवा.