तुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही? वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 12:34 PM2018-11-24T12:34:26+5:302018-11-24T12:38:18+5:30
सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह.
सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. अनेक कारणांमुळे मधुमेह होतो. आजकाल अनेक लोक अगदी सर्रास कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत असतात. या कारणामुळे ही लोक डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर असतात. गोंधळलात ना? थांबा... अहो डायबिटीजची बॉर्डर लाइन म्हणजे या व्यक्तींना मधुमेह झालेला नसतो पण होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हीदेखील असेच डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर उभे असाल तर घाबरून जाऊ नका फक्त तुमच्या दैनंदिन रूटीनकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि थोडे बदल करा.
डायबिटीजची बॉर्डर लाइन म्हणजे काय?
सामान्य व्यक्तींच्या रक्तामध्ये साखरेची पातळी जेवण न करता 100 आणि जेवल्यानंतर 135 मिलीग्राम असते. जर हेच प्रमाण अनुक्रमे 140 आणि 200 मिलीग्रामपर्यंत पोहोचले तर ही डायबिटीजची बॉर्डर लाइन असते. यामध्ये औषधं खाण्याची गरज नसते परंतु काळजी घेणं गरजेचं असतं. खरं पाहिलं तर ही एक सुचनाच असते. तुम्ही तुमच्या रक्तातील हे प्रमाण नियंत्रणात ठेवून स्वतःचा मधुमेह होण्यापासून बचाव करू शकता. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्हीही मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकता.
मधुमेह होण्याची कारणं :
- जीवनशैली ठिक नसणं
- वेळेवर न झोपणं आणि उठणं
- सतत तणावाखाली वावरणं
- चुकीच्या पद्धतीने आहार घेणं
- व्यायाम न करणं
- अनुवांशिक कारण
मधुमेहाचे दोन प्रकार :
मधुमेहाचे दोन प्रकार असतात. एक टाइप वन आणि दुसरं टाइप टू डायबिटीज. टाइप वन डायबिटीजचा प्रकार लहान मुलांमध्ये आढळून येतो. शरीरातील वीटासेल डॅमेज झाल्यामुळे लहान मुलांना हा आजार होतो. अशा मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचं सेवन करावं लागतं. टाइप टू डायबिटीज प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु आता डायबिटीज रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या वाढत आहे.
मधुमेहामुळे खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो :
- सतत भूक आणि तहान लागणं
- सतत लघवीला होणं
- थकवा येणं
- डोळ्यांच्या समस्या किंवा दृष्टी कमी होणं
- त्वचेला इन्फेक्शन होणं
असा करा बचाव :
- गोड पदार्थांचं सेवन टाळा.
- तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणं टाळा.
- दर दोन तासांनी थोडं थोडं खाणं आवश्यक.
- रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत रहा.
- व्यायाम करा.