धुम्रपानापासून दूर? तरीही बैठी जीवनशैली देईल धुम्रपानाचे धोके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:40 PM2017-09-16T14:40:51+5:302017-09-16T14:44:14+5:30
‘उठा’, नाहीतर यमदूत समोरच उभा आहे!
- मयूर पठाडे
आराम करायला, मस्त बसून राहायला सगळ्यांनाच आवडतं, पण किती? बसणार आणि आराम तरी किती करणार? अर्थातच आजकालच्या फास्ट जमान्यात कुणी राजीखुशीनं एका जागेवर बसत नाही, हेही खरंच. आपल्या जबाबदाºयाच आपल्याला एका जागेवर बसवतात, तिथून आपल्याला उठू देत नाही.. पण त्यामुळे कोणत्या धोक्याला तुम्ही जवळ आणताहेत हे तुम्हाला माहीत आहे?
तुम्ही जितक्या जास्त वेळ एकाजागी बसाल, तेवढा मृत्यूही तुमच्या जवळ येईल आणि एकदिवस यमदूत तुम्हाला आपल्या सोबत घेऊन जाईल.. इतरांपेक्षा खूपच लवकर.. असा इशाराच संशोधकांनी दिला आहे.
त्यामुळे बसून राहाण्याची कितीही ‘सक्ती’ तुमच्यावर असली तरीही अर्धा-पाऊण तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही एकाच जागी चिटकून बसू नका, असं संशोधकांचं म्हणणं आहे. प्रत्येक तीस-चाळीस मिनिटांनंतर किमान दोन-पाच मिनिटांचा ब्रेक घेतला तर यमदूत तुमच्यापासून दूर राहील असं त्यांचं म्हणणं आहे.
संशोधकांनी तर या बैठ्या जीवनशैलीचं थेट गणितच मांडून दाखवलं आहे. सर्व मिळून रोज तुम्ही १३ तासाच्या आसपास बसत असाल, बैठं काम करीत असाल किंवा साठ ते नव्वद मिनिटं सलग तुम्ही बसलेला असलात, तर इतरांपेक्षा मृत्यू दुप्पट वेगानं तुम्हाला गाठू शकतो!
या जीवनशैलीमुळे मृत्यूचा धोका किमान दुप्पट वाढतो. याकडे तातडीनं लक्ष द्या आणि जीवनशैली बदला असा संशोधकांनी कळकळीनं सल्ला दिला आहे.
कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला असून जगभरात बैठ्या जीवनशैलीचं प्रमाण वाढतं आहे. वेगवेगळ्या जबाबदाºया आणि आधुनिक तंत्रज्ञानही त्याला कारणीभूत आहे असं त्यांचं निरीक्षण आहे.
ही बैठी जीवनशैली इतकी घातक आहे, की शास्त्रज्ञांनी त्याला ’आधुनिक जगातलं धुम्रपान’ असंच नाव दिलं आहे.
धुम्रपानामुळे जे धोके आपल्याला होतात, तशाच प्रकारचे धोके या बैठ्या जीवनशैलीनं आपल्याला देऊ केले आहेत, त्यामुळे त्यापासून लांब राहिलात, तर जास्त काळ जगाल.. असा शास्त्रज्ञांचा सल्ला आहे. बघा, तुम्हाला तो मानायचा की नाही? मानला तर फायदा नक्कीच आहे..