दुखण्याने अस्वस्थ आहात ?- पाण्यात बसा, चाला, डुंबा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 08:27 AM2022-02-26T08:27:04+5:302022-02-26T08:28:23+5:30

पाण्यात उतरून पोहणे, व्यायाम करणे किंवा निव्वळ चालणे हा शारीरिक व्याधी व मानसिक अस्वस्थतेवरचा मोठा इलाज असू शकतो! - नव्या संशोधनाची माहिती!

article on Water Therapy System Booming Worldwide Pain Management Technologies what to do | दुखण्याने अस्वस्थ आहात ?- पाण्यात बसा, चाला, डुंबा !

दुखण्याने अस्वस्थ आहात ?- पाण्यात बसा, चाला, डुंबा !

googlenewsNext

डॉ. संग्राम पाटील, वेदना विशेषज्ज्ञ (पेन स्पेशालिस्ट), लंडन

औद्योगिकीकरणानंतर माणसाच्या वाट्याला आलेल्या बहुतांश व्याधी त्याच्या निसर्गापासून तुटण्यातून आल्या आहेत. त्यामुळे माणसाने आपले सततचे धावणे थांबवून निसर्गाशी पुन्हा जवळीक साधावी आणि हाच वैद्यकीय उपचार मानावा असा विचार जगभरात मूळ धरू लागला आहे. निसर्गात गेल्यास, निसर्गाशी पुन्हा नातं जुळवल्यास आपले शरीर आणि मनाची हानी भरून काढता येते काय  यावर  प्रयोग सुरू आहेत. थंड पाण्याने आंघोळ करण्यासंदर्भात अलीकडे काही शास्त्रीय अभ्यास प्रसिद्ध झालेत.

पोहताना पाण्यात शरीर बुडवल्यानंतर निर्माण होणाऱ्या जलदबावामुळे फुफ्फुस, छाती, पोटाच्या मधला डायफ्राम आणि रक्तवाहिन्यांवर होणारे परिणामदेखील महत्त्वाचे असतात. या सगळ्यांमुळे नाडीचा वेग, रक्तदाब कमी होतो, हृदयाची व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि श्वासाचे तंत्र अधिक प्रभावी होते. यामुळेच पोहणाऱ्या लोकांमधील अकाली मृत्यूचे प्रमाण इतरांपेक्षा ४१ टक्क्यांनी कमी असते असे दिसून आले आहे. 

पाण्यात उतरणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्मोन्सचे काही बदल होतात, त्यातून मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो. सांधे किंवा स्नायूंचे जुनाट दुखणे असलेल्या रुग्णांना पोहणे, व्यायाम किंवा निव्वळ चालणे हे देखील फायद्याचे ठरते. पाण्यात उतरल्यावर आपले वजन ७५ टक्क्यांनी कमी जाणवते. स्नायूंचा रक्तप्रवाह २२५ टक्क्यांनी वाढतो. स्नायू व सांधे यांच्या हालचाली करताना वेदना कमी होतात. रुग्णांना दुखण्यामुळे व्यायाम करता येत नसेल तर पाण्यात उतरून व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. या पद्धतीने बहुतांश रुग्ण व्यायामास सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यामुळे त्यांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 

नैसर्गिक तसेच तरण तलावाच्या पाण्यात पोहणे किंवा पाण्यात केवळ उतरणे देखील मानसिक आरोग्यासाठी भावी ठरते. स्वतःवरील विश्वास वाढून आरोग्याविषयी सकारात्मक भावना निर्माण होतात. नैराश्य आणि चिंता कमी करण्यासही मदत होते. नैसर्गिक पाण्यात (तलाव, विहीर, नदी, समुद्र) उतरल्याने त्यातील क्षार, सभोवतीचा निसर्ग, शुद्ध हवा यांचे फायदे आरोग्यावर होतात. या प्रकाराला आजकाल इकोथेरपी असे म्हटले जाते. इकोथेरपीतून शरीरातील अति-उत्तेजित यंत्रणा, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था, मानसिक अस्वस्थता नियंत्रणात ठेवण्यास, शांत होण्यास मदत होते. या अनुभवांमधून मानसिक लवचिकता वाढून ‘आपण हे करू शकतो, समजतो तेवढे आपण कमजोर नाही’ असा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. 

शरीर थंड पाण्यात डुंबते तेव्हा डोपामिन आणि एन्डॉर्फिन हे आनंद वाढवणारे हार्मोन्स शरीरात वाढतात. त्यामुळे जगण्यातील आनंद वाढवण्यास हातभार लागू शकतो. थंड पाण्यातील डुबकी किंवा पाण्यात उतरणे हे शरीराच्या पॅरासिम्पाथेटीक नर्व्हस सिस्टीमला सक्रिय करते. जुनाट आजार, जुनाट दुखणे, प्रतिकारशक्ती संदर्भातील असमतोल, शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्यास पॅरासिम्पाथेटीक यंत्रणा सक्रिय होणे फायदेशीर असते. 

आपल्या देशात मुबलक उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पाणीसाठ्यांचा पुरेपूर उपयोग शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी नक्कीच करायला हवा.  पाण्यात डुंबणे हे (अनेकांना) विनाखर्च उपलब्ध आहे.  

पश्चिमी देशांत घरोघरी बाथ टब उपलब्ध असतात. आपल्याकडेही अशी बाथ टबसारखी सुविधा सहज तयार करता येऊ शकते. पाण्यात बसता किंवा लोळता येईल अशी सोय असली तरी काम होईल. ग्रामीण भागात या प्रकारचे पर्याय सहज उभे करता येतील. शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर लोकांना आपापल्या परिसरात सुरक्षितपणे पाण्यात उतरता किंवा पोहता येईल अशी स्वच्छ पाण्याची सोय स्थानिक तलाव, नद्या किंवा धरणं अशा ठिकाणी करून देता येईल का याचा जरूर विचार व्हायला हवा.

Web Title: article on Water Therapy System Booming Worldwide Pain Management Technologies what to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य