योग्य उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:05 AM2024-05-06T09:05:13+5:302024-05-06T09:05:29+5:30
‘जागतिक अस्थमा दिन’ दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. या दिनाच्या निमिताने जगभरात या आजाराबद्दल जनजागृती घडविली जाते.
- डॉ. लॅन्सलॉट पिंटो, श्वसनविकार तज्ज्ञ, हिंदुजा हॉस्पिटल
गेल्या काही वर्षांत देशात अस्थमा, या आजाराला दमा असे देखील संबोधिले जाते, त्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार फुफ्फुसाशी निगडित असून, यामध्ये श्वसनलिका आकुंचन पावतात. त्यावर सूज येते त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. हा दीर्घकालीन आजार असून चांगल्या औषधोपचारामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे सोपे असते. मात्र, यासाठी रुग्णांनी सुद्धा काही पथ्यं पाळणे गरजेचे आहे. अनेक वेळा दम्याचे निदान न झाल्याने रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे या रुग्णांमध्ये मोठी गुंतागुंत निर्माण होऊन जीवावर सुद्धा बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
‘जागतिक अस्थमा दिन’ दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. या दिनाच्या निमिताने जगभरात या आजाराबद्दल जनजागृती घडविली जाते. आपल्याकडे दमा या आजाराविषयी अनेक गैरसमज आहे. आपल्याकडे आजारात दम लागला तरच दमा असा आजार आहे असे मानले जाते. मात्र ते पूर्णपणे चुकीचे असून अनेकवेळा सतत येणार खोकला सुद्धा दम्याचे लक्षण असते. दम्याचे अनेक रुग्ण ॲलर्जीच्या नावाखाली दुर्लक्षित होतात. तसेच अनेक वेळा ते अँटिबायोटिक्स घेऊन त्या आजारावर उपचार घेतात. मात्र, या रुग्णांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे या आजाराचे व्यवस्थित निदान करणे गरजेचे आहे. पी.एफ.टी. आणि रक्ताच्या चाचण्या करून दमा आजाराचे निदान करणे शक्य आहे.
अनेकवेळा काही डॉक्टर रुग्ण नाराज होईल म्हणून किंवा उपचार घेणार नाही यामुळे दमा न सांगता ॲलर्जी किंवा ब्रॉन्कायटिस हा आजार सांगतात. मात्र, यामुळे रुग्ण मूळ आजारांपासून अनभिज्ञ राहतात. भारतात ४ ते २० टक्के प्रमाणात लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येतो . तर २ टक्के प्रौढांमध्ये हा आजार आढळून येतो. लहानपणी या आजाराचे निदान होऊन उपचार घेतल्यास रुग्ण वयाच्या १८ वर्षांपर्यंत पूर्णपणे बरा होतो. तर प्रौढांमध्ये हा आजार दीर्घकालीन असतो. त्यासाठी त्यांना आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात.
दम्याच्या रुग्णांनी ॲसिडिटी होणार नाही, याची अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण ॲसिडिटी झाली की, हा आजार असणाऱ्या रुग्णांना खोकल्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. काही वेळा अस्थमा अटॅक सुद्धा येतो. अशा वेळी रुग्णांनी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. अन्यथा डॉक्टरांनी दिलेले औषधाचे पंप जवळ बाळगणे गरजेचे आहे. या आजारावर सध्या बाजरात चांगली औषधे उपलब्ध आहेत. त्यामध्ये विशेष करून इन्हेलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जर सर्व पथ्ये पाळली आणि औषधे घेतली तर या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.
लक्षणे
दम लागणे, छाती भरून येणे, जास्त हसल्यावर किंवा रडल्यावर खोकला येणे, घशात जळजळ होणे.
कारणे ?
वारंवार खोकला, आनुवंशिक आजार, धूम्रपान, वातावरणातील बदल
आजार होऊ नये म्हणून...
ताण-तणावामुळे दमा असणाऱ्या रुग्णांचा हा आजार बळावतो, त्यामुळे योगासने करावीत.
संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून रोग प्रतिकारकशक्ती चांगली ठेवावी.
शक्य तेवढे प्रदूषणापासून दूर राहणे गरजेचे आहे.