उच्च रक्तदाब टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:51 PM2019-01-04T22:51:22+5:302019-01-04T22:53:10+5:30
हृदयविकार, अर्धांगवायू, हृदयाचा झटका (हार्टअटॅक) व मूत्रपिंडाच्या आकस्मिक बिघाडाचे उच्च रक्तदाब हे प्रमुख कारण मानले जाते. रक्तदाबाचा शोध सर्वप्रथम अठराव्या शतकात स्टेफेन हेल्स यांनी घोड्यावर प्रयोग करून लावला. वाढत्या रक्तदाबामुळे हृदयावरील वाढत्या ताणामुळे हृदयविकार वाढू लागतो. केवळ रक्तदाबापेक्षा त्यासोबत इतर घातक घटकही यासाठी कारणीभूत ठरतात. भारतात ग्रामीण भागात १८ ते ७४ वर्षे वयोगटात २.५ ते ३.५ टक्के व शहरी भागात ४ ते १८ टक्के लोकात रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.
हृदयविकार, अर्धांगवायू, हृदयाचा झटका (हार्टअटॅक) व मूत्रपिंडाच्या आकस्मिक बिघाडाचे उच्च रक्तदाब हे प्रमुख कारण मानले जाते. रक्तदाबाचा शोध सर्वप्रथम अठराव्या शतकात स्टेफेन हेल्स यांनी घोड्यावर प्रयोग करून लावला. वाढत्या रक्तदाबामुळे हृदयावरील वाढत्या ताणामुळे हृदयविकार वाढू लागतो. केवळ रक्तदाबापेक्षा त्यासोबत इतर घातक घटकही यासाठी कारणीभूत ठरतात. भारतात ग्रामीण भागात १८ ते ७४ वर्षे वयोगटात २.५ ते ३.५ टक्के व शहरी भागात ४ ते १८ टक्के लोकात रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.
रक्तदाब वाढण्याची अनेक कारणे आहेत. मुंबईसारख्या धावपळीच्या जगात व एकंदरीत स्पर्धेच्या युगात वाढत्या रक्तदाबामुळे तरुण वयातच हृदयाचा झटका येत असल्याचे निदर्शनास येते. हृदय हा एक पंपासारखे काम करणारा अवयव आहे. हृदय आकुंचन पावताना मोजला जाणारा रक्तदाब १०० ते १५० मि.मी. मर्क्युरी व प्रसारण पावताना मोजला जाणारा रक्तदाब ६० ते ९० मि.मी. मर्क्युरी हा साधारण समजला जातो. यापेक्षा जास्त वाढलेल्या रक्तदाबाला उच्च रक्तदाब ‘हायपरटेन्शन’ म्हणतात.
१) आनुवंशिकतेमुळे आई, वडील, आजोबा-आजी आदींना असलेला रक्तदाब त्यांच्या मुलांना, नातवंडांना होतो. रक्तदाब असलेल्या पालकांच्या मुलांमध्ये रक्तदाब नसलेल्या पालकांच्या दीडपट उच्च रक्तदाब असतो. २) वय, लिंग, वाढत्या वयाप्रमाणे स्त्री वा पुरुष हा लिंगभेद वगळता रक्तदाब वाढत राहतो. ३० ते ६५ वर्षाच्या वेळी हृदय आकुंचन व प्रसरण पावतानाचा रक्तदाब अनुक्रमे २० व १० मि.मी. मर्क्युरीने वाढलेला आढळतो. ३) मद्यपानाचे व रक्तदाबाचे जवळचे नाते वैज्ञानिकांनी सांगितले आहे. बीअर पिणाऱ्यांमध्ये ३८ टक्के व व्हिस्की पिणाऱ्यांमध्ये ५६ टक्के उच्च रक्तदाबाचे प्रमाण असते. कमी प्रमाणात (४० मि.मी.) मद्यपान केल्याने अपाय होत नाही. ४) भौगोलिक कारण समुद्रसपाटीपासून उंच राहणाºयांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी आढळते याचे कारण प्राणवायूचे कमी प्रमाण. ५) जास्त मीठ खाण्याचा व उच्च रक्तदाबाचा अतिघनिष्ठ संबंध आहे. तीन ग्राम अथवा त्यापेक्षा कमी प्रमाणात रोजच्या जेवणात मीठ असणे फायद्याचे आहे. ७ ते ८ ग्राम रोज मीठ खाण्याने उच्च रक्तदाब होणे स्वाभाविक ठरते. उत्तर भारतात दक्षिणेच्या लोकांपेक्षा दुप्पट मीठ खाण्याची सवय असूनही रक्तदाबाच्या संदर्भात तसे प्रमाण प्रत्यक्षात उलट आढळल्याचे स्पष्टीकरण माहीत नाही. रक्तदाबाच्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील मीठ व पाण्याचे वाढलेले प्रमाण बाहेर फेकण्याच्या प्रक्रियेतील बिघाड. ६) व्यायाम: व्यक्तीच्या जीवनशैलीवर रक्तदाब अवलंबून असतो. खाऊनपिऊन आराम करणाºयांमध्ये व बसून काम करणाºयांमध्ये उच्च रक्तदाब ७८ टक्के प्रमाणात दिसतो. ३० टक्के रक्तदाबाच्या रुग्णांनी खेळात भाग घेतल्याचे एका संशोधन पत्रकात नमूद केले आहे. ७) धूम्रपान: तंबाखू खाल्ल्याने व बिडी-सिगारेट ओढल्याने तात्काळ रक्तदाब वाढतो. पण सातत्याने सिगारेट ओढल्याने वाढत्या रक्तदाबाचे निश्चित नाते स्पष्ट नाही. तंबाखूतील निकोटीन हे जळल्यानंतर कार्बन मोनो ऑक्साइडसोबत रक्तात मिसळून मज्जातंतू खराब करते. ५८ टक्के रुग्णात १० सिगारेटी ओढणारे व १८ टक्के रुग्णात रोज २० सिगारेटी ओढण्याचे प्रमाण एका अभ्यासात आढळते. दहा वर्षापेक्षा अधिक काळ सिगारेट ओढणारे रुग्ण ७७ टक्के आढळतात. किती सिगारेट किती काळ ओढल्या यावर रक्तदाब वाढण्याचे प्रमाण निश्चित होते. ८) चहा, कॉफी, पाच कपांपेक्षा जास्त पिणारे उच्च रक्तदाब असणारे रुग्ण असल्याचे राष्ट्रीय सीएसआय अभ्यासात दिसून आले आहे. ९) झोपेचा कालावधी: याबाबत जास्त माहिती उपलब्ध नसली तरी लवकर झोपून उठणे फायद्याचे असते. तसे झोप न झाल्याने माणूस चिडचिडा बनतो व रक्तदाब वाढण्याची शक्यता इतर सवयी व कारणासोबत अधिकच असे. १०) ताण: वातावरणामुळे मानसिक ताण हा घटक अति उच्च रक्तदाबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दिमागी ताण, दुखणे, जोराचा आवाज व इतर कारणांनी तात्काळ रक्तदाब वाढतो आणि हा वाढलेला रक्तदाब नंतर हायपरटेन्शनमध्ये बदलू शकतो. वाढत्या रक्तदाबामुळे सामान्य माणसापेक्षा अशा रुग्णात हृदयाच्या रक्तवाहिन्या (कोरोनरी) आकुंचन पावण्याचे व त्यात अडथळा होण्याचे प्रमाण अधिक असते. ११) रक्तदाब व मधुमेह या दोन रोगांचा जवळचा संबंध आहे. स्निग्ध पदार्थाचे रक्तातील वाढते प्रमाण, युरिक अॅसिड वाढणे व हृदयाचा डावा कप्पा मोठा होणे आदी दोन्ही आजारातील विपरीत परिणाम सारखेच आहेत. त्यामुळे दोन्ही रोग एकत्र असल्यास हृदयविकार लवकर जडतो.
वाढलेला रक्तदाब सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात असल्याने तसा चटकन आपल्या लक्षात येत नाही. अधिक काळ वाढता रक्तदाब विनानियंत्रणाचा राहिल्याने लक्षण दिसू लागतात. त्यामुळे ४० वर्षानंतर अधूनमधून त्रास नसताना रक्तदाब तपासून घेणे उपायुक्त ठरते. बऱ्याचदा डोळ्यांच्या डॉक्टरांमुळे रक्तदाब व दातांच्या डॉक्टरांमुळे मधुमेह असल्याचे निदानहोते हा योगायोगाच म्हणाव लागेल. लक्षणे: १) डोके दुखणे: सकाळी झोपेतून उठल्यावर माथा दुखणे अथवा डोके जड जड होणे हे वाढत्या रक्तदाबाचे अत्यंत महत्त्वाचे व प्राथमिक लक्षण आहे. २) चक्कर येऊ लागते व रोग्याला स्वत:चा झोक गेल्याचे जाणवू लागते. ३) हृदयाचे ठोके वाढणे अथवा धडधड होणे हेही लक्षात येण्याजोगे आहे. ज्यामुळे रुग्ण घाबरून जातो. ४) दम लागणे: थोडे अंतर चालल्यावर, पायऱ्या चढताना अथवा चढ चढताना दम लागतो. ५) डोळ्यासमोर अंधारी आल्यागत होऊन अति उच्च रक्तदाबामुळे तात्काळ नजर जाऊ शकते. ६) उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडावर असर होऊन जास्त वेळ लघवी होणे, लघवीतून रक्त जाणे आदी लक्षणे दिसतात. ७) छातीत दुखणे हे दीर्घकाळ रक्तदाब वाढल्याने हृदयावर परिणाम झाल्याने होते. हे दुखणे डाव्या खांद्याकडे जाऊन डाव्या हातापर्यंत पसरणे म्हणजे हार्ट अटॅकला निमंत्रणच होय. ८) नाकातून रक्त वाहणे हेही लक्षण उच्च रक्तदाबाच्या रुग्णात दिसते.
वरील लक्षणाबरोबरच रक्तदाब वाढण्यासाठी सोबत असलेल्या इतर आजारांचीही लक्षणे दिसून येतात. ज्याप्रमाणे कुशिंग सिन्ड्रोममध्ये वाढलेले शारीरिक वजन, फिओक्रोमोसायटोमात घटलेले वजन, सिन्ड्रोममध्ये कमजोर झालेले स्नायू, दमा, संधिवात आदी. याबरोबरच रुग्ण इतर रोगासाठी औषधोपचार घेत असल्यास उदा. गर्भनिरोधक गोळ्या, स्टेरॉईड, कोल्ड रेमीडीज, नेजल स्प्रे (पंप), मीठ, मानसिक उपचार आदीमुळेही रक्तदाब वाढण्यास मदत होते.
रोग्याचा संपूर्ण इतिहास, तपास व चाचण्या केल्यावर रोगनिदान करणे सहज शक्य आहे. रक्तदाब घटविण्यासाठी अथवा नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य वजन कायम ठेवणे, जास्त असल्यास घटविणे, व्यायाम-योगा, मीठ कमी खाणे, दारू, सिगारेट बंद करणे, फिश आॅईल घेणे, विश्रांती आदी उपयुक्त आहेत. जास्त वाढलेल्या रक्तदाबाने मेंदूवर परिणाम होतो व हृदयाचा डावा कप्पा हळूहळू मोठा होऊ लागतो व पुढे चालून कोरोनरी आर्टरिजमध्ये रक्तप्रवाह खंडित झाल्याने वा रक्ताची गाठ झाल्याने हृदयाचा झटका येतो. मेंदूत रक्तस्राव होऊन अर्धांगवायूचा विकार, अचानक मूत्रपिंडात बिघाड (किडनी फेल), आदी गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता रक्तदाब नियंत्रित ठेवणेच हिताचे ठरणार आहे. नियमित आहार, संतुलित आहार व व्यायाम अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. रोहिदास वाघमारे एम.डी. (मेडि.)