फक्त फायदाच नाहीतर नुकसानदायी ठरतात तांब्याची भांडी; जरा जपून अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:15 AM2019-10-07T11:15:58+5:302019-10-07T11:17:48+5:30
आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण अनेकदा वाचतो. खरं तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण अनेकदा वाचतो. खरं तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे. एवढचं नाहीतर अनेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. अनेकदा आपण ऐकतो की, तांबं किंवा तांब्याची भांड्यांमध्ये जेवणं किंवा पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. तांबं म्हणजेच कॉपर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे तुम्हाला फिट अन् फाइन होण्यास मदत होते.
तांब्यांच्या भांड्यांमध्ये जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच काही असे पदार्थ आहेत. जे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवणं किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्यांचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जसं की, दूध, दही आणि लोणची यांसारखे पदार्थ तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
लोणची
तांब्याच्या भांड्यामध्ये लोणची ठेवल्याने कॉपरच्या संपर्कात येऊन पॉयझनिंग इफेक्ट तयार होतात. याच्या सेवनाने तुम्हाला फूड पॉयझनिंग, पोटात जळजळ, अॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं लोणचं जास्त दिवस टिकतंही नाही.
दही
दह्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक गुड बॅक्टेरिया अस्तित्त्वात असतात. ज्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये हे ठेवल्याने यामध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन त्याचे उलटे परिणाम दिसून येतात. दूध किंवा दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले दही खाल्याने उलटी, डायरिया आणि पोटासंबंधातील आजारांचा सामना करावा लागतो.
लिंबाचा रस
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पण जर यामध्ये लिंबू सरबत किंवा लिंबाचा वापर करून तयार केला जाणारा कोणताही पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. कारण असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. लिंबाच्या रसामध्ये असणारं अॅसिड तांब्यासोबत एकत्र येतं आणि केमिकल रिअॅक्शन होते. त्यामुळे त्यातील पदार्थांमध्ये बदल घडून येतात. परिणामी त्या पदार्थाचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दावा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला देणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.)