पालघर जिल्ह्यात आजारांबाबत जनजागृती; ‘केईएम’चा पिरामल फाउंडेशनसोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:17 AM2023-11-03T06:17:00+5:302023-11-03T06:17:27+5:30
कराराच्या माध्यमातून रुग्णालयाकडून टेलिमेडिसिनच्या माध्यमातून उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईपासून जवळ असणाऱ्या पालघर या आदिवासी जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. अनेकवेळा गरोदर महिला रुग्णालयात पोहचण्याच्या आधीच रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अशा भागात येथील रुग्णांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून पिरामल फाउंडेशनने के. इ. एम. रुग्णालयासोबत गुरुवारी करार केला. या अंतर्गत या जिल्ह्यात आजाराबाबत जनजागृती आणि येथील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कराराच्या माध्यमातून रुग्णालयाकडून टेलिमेडिसिनच्या माध्यमातून उपचार तसेच तेथील आरोग्य स्वयंसेवक आरोग्य कर्मचारी आणि परिसरात काम करणारे वैद्यकीय विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रुग्णाचे हेल्थ रेकॉर्डही तयार करणार
पालघर जिल्ह्यात महिला आणि लहाने मुलांचे आरोग्य तसेच संसर्गजन्य आजार असलेला टीबी तसेच पोषणद्रव्ये व्यवस्थित न मिळाल्यामुळे ॲनिमियाचे मोठे प्रमाण आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टर या भागात जाऊन तेथील लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्या ठिकाणी उपचार देतील. तसेच गरज वाटल्यास केईएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतही केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून रुग्णाचे हेल्थ रेकॉर्ड तयार करणे, त्यासंदर्भातील प्रशिक्षण देणे हे कामही पिरामल ग्रुपतर्फे करण्यात येणार आहेत. यावेळी रुग्णालयातर्फे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ. स्वाती पिरामल उपस्थित होत्या.