आयुष्मान वय वंदना कार्ड कसे बनवायचे? 22 हजारांहून अधिक लोकांना लाभ, 40 कोटी रुपये खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 19:36 IST2024-12-09T19:36:26+5:302024-12-09T19:36:46+5:30
Ayushman Vay Vandana Card : आयुष्मान वय वंदना कार्ड लाँच झाल्यापासून लोकांच्या उपचारांवर 40 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

आयुष्मान वय वंदना कार्ड कसे बनवायचे? 22 हजारांहून अधिक लोकांना लाभ, 40 कोटी रुपये खर्च
Ayushman Vay Vandana Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कव्हर करण्यासाठी विस्तारित करण्याची घोषणा केली होती. या विस्तारांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 'आयुष्मान वय वंदना कार्ड' देण्यात येत आहे. योजनेद्वारे नागरिक आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत.
आयुष्मान वय वंदना कार्ड लाँच झाल्यापासून लोकांच्या उपचारांवर 40 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 22,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
अनेक आजारांवर उपचार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 29 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्डसाठी 25 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनरी अँजिओप्लास्टी, हिप फ्रॅक्चर/रिप्लेसमेंट, पित्ताशय काढणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 'प्रोस्टेट रेसेक्शन', स्ट्रोक, हेमोडायलिसिस, विषमज्वर आणि इतर तापजन्य आजारांसारख्या विविध परिस्थितींवर उपचार केले आहेत, असे मंत्रालयाने सांगितले.
पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण
आयुष्मान वय वंदना कार्ड हे सामाजिक-आर्थिक स्थिती न पाहता 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. हे कार्ड सुमारे 2000 वैद्यकीय प्रक्रियांचे उपचार देते आणि कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय पहिल्या दिवसापासून सर्व विद्यमान आजारांना कव्हर करते. आयुष्मान वय वंदना कार्डसाठी नावनोंदणी करण्यासाठी, पात्र लाभार्थी आयुष्मान ॲप डाउनलोड करू शकतात किंवा जवळच्या संलग्न हॉस्पिटलला भेट देऊ शकतात.
आयुष्मान वय वंदना कार्ड बनवण्याची प्रक्रिया
आयुष्मान वय वंदना कार्डसाठी, अधिकृत वेबसाइट https://nha.gov.in/PM-JAY ला भेट द्या. तेथे तुम्हाला PMJAY For 70+ चा पर्याय दिसेल. या पर्यायातील एनरोलवर क्लिक करा. जर एखादी व्यक्ती स्वतःसाठी अर्ज करत असेल तर, बेनेफिशियरी पर्याय निवडा आणि सर्व आवश्यक माहिती भरून लॉग इन करा. कुटुंबातील एखादा सदस्य वृद्धांसाठी अर्ज करत असल्यास ऑपरेटर पर्याय निवडा. अर्जासाठी आधार कार्ड, फॅमिली आयडी यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते.