बी पॉझिटिव्ह : आपली सूत्रे आपल्याच हाती असू द्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 08:31 AM2024-08-22T08:31:27+5:302024-08-22T08:31:46+5:30

रोज दुपारी ताप चढायला लागायचा, मग कधी उलट्या, कधी पोट बिघडलेले. 

B Positive : Let your formulas be in your own hands... | बी पॉझिटिव्ह : आपली सूत्रे आपल्याच हाती असू द्या...

बी पॉझिटिव्ह : आपली सूत्रे आपल्याच हाती असू द्या...

- वंदना अत्रे (दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)


समीराला एकाएकी ताप आणि थकवा आला तेव्हा नेहमीची औषधे घेत ती पुन्हा कामाला लागली. पण ताप हटण्याचे लक्षण दिसेना. सगळ्या चाचण्या करून झाल्या, पण तापाचे नेमके कारण कुठेच सापडेना. रोज दुपारी ताप चढायला लागायचा, मग कधी उलट्या, कधी पोट बिघडलेले. 

एक-दोन वेळा दवाखान्यात भरतीही करून झाले. पण नेमके निदान होईना. शेवटी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अक्षरशः चंग बांधून मेडिकल जर्नल्स वाचून, मित्रांशी चर्चा करून अखेरीस निदान केले आणि त्यांच्या पुढील उपचारांना यश आले. पण रोज दुपारी ताप चढण्याच्या जवळजवळ तीन आठवडे घेतलेल्या या अनुभवांचा जो धसका समीराने घेतला तो इतका होता की, त्यानंतर रोज दुपारी तीनच्या सुमारास ती पुन्हा पुन्हा कपाळावर हात ठेवून तापमान तपासून बघायची. मैत्रिणीकडून ताप नसल्याची खात्री करून घ्यायची. 

या अनुभवाचे भूत तिला एवढे छळत होते की, त्याचा परिणाम तिच्या बाकी कामावर होऊ लागला. भूतकाळाची भुते अशी मानगुटीवर बसली की, ती आव्हानांना सामोरे जाण्याच्या आपल्या क्षमतांबद्दल आपल्या मनात शंका निर्माण करतात आणि पराभवाची, मृत्यूची भीती आपल्याला ग्रासू लागते. मनावर ताण येऊन त्याचा परिणाम आपल्या निर्णय प्रक्रियेवर होऊ लागतो. 

अशावेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, आयुष्यात येणारे सगळे ताण वाईट नसतात. ते आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारांकडे, पर्यावरणाकडे, त्यातील आपल्या सहभागाकडे डोळसपणे बघण्याचे शिक्षण देत असतात. समीराच्या आजाराचे मूळ ती ज्या कॅफेमध्ये कोल्ड कॉफी प्यायची तिथे वापरल्या जाणाऱ्या दुधात सापडले.

डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा तिला जे प्रश्न विचारून तिच्या भूतकाळाकडे बघण्यास प्रवृत्त केले त्यातून हे उत्तर मिळाले. आपल्या वाट्याला येणारी आजारपणे, मानसिक तणाव, भय अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टर नेमकेपणाने देऊ शकतीलच, असं नाही. त्यासाठी आपण सजग राहणे आणि आपल्या व्यवहारांकडे जागरूकपणे बघणे म्हणजे आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात घेणे आहे. हे जितक्या लवकर समजेल तितके बरे!


 

Web Title: B Positive : Let your formulas be in your own hands...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य