वाईट सवयींमुळे क्षीण होते शारीरिक ऊर्जा - तज्ज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:33 AM2019-01-14T10:33:42+5:302019-01-14T10:36:25+5:30
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण आणि त्यामुळे होणारा मानसिक ताण अशात काही वाईट सवयींमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत.
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण आणि त्यामुळे होणारा मानसिक ताण अशात काही वाईट सवयींमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. कारण लोकांची शारीरिक ऊर्जा दिवसेदिवस क्षीण होत चालली आहे. तज्ज्ञ ही फारच गंभीर बाब असल्याच सांगत आहेत. शारीरिक ऊर्जा कमी करणाऱ्या वाईट सवयी बदलून लोक एक चांगलं निरोगी आयुष्य जगतात.
ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्व्हेच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारताच्या एकूण १३० कोटी लोकसंख्येपैकी २८.६ टक्के लोक तंबाखू खातात. तसेच रिपोर्टमधून आणखी धक्कादायक बाब समोर आली की, साधारण १८.४ टक्के तरुण केवळ तंबाखूच नाही तर सिगारेट, बीडी, खैनी, अफू आणि गांजा या जीवघेण्या नशेचंही सेवन करतात.
गेल्यावर्षी WHO च्या ग्लोबल स्टेटस रिपोर्टमध्ये काही धक्कादायक आकडेवारी समोर आली होती, २०१७ मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार भारतात गेल्या ११ वर्षात प्रति व्यक्ती मद्याची विक्री दुप्पट झाली आहे. ११ वर्षांपूर्वी एक व्यक्ती जिथे ३ लीटर मद्यसेवन करत होता, ते प्रमाण आता वाढून ६ लीटर झालं आहे.
रिपोर्टनुसार, या दशकात भारतीय तरुणांमध्ये तंबाखू आणि मद्य यासोबतच एका आणखी नशेची सवय फार वाढत आहे. ती म्हणजे ड्रग्स. या नशेमुळे शारीरिक कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी ऊर्जेचा अधिक वापर होतो. ज्याकारणाने फुफ्फुसात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात.
खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये गेल्या काही वर्षात फार मोठा बदल झाला आहे. सुपरफूडपासून ते जंक फूडपर्यंत सर्वच ग्रामीण भागातही आता सहज मिळू लागलं आहे. २०१८ मध्ये आलेल्या क्लिंटच्या एका रिपोर्टनुसार, ३४ टक्के भारतीय आठवड्यातून कमीत कमी एक वेळा फास्ट फूड खातात.
इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका सर्व्हेक्षणानुसार, १४ टक्के शाळकरी मुले जाडेपणाचे शिकार आहेत. जंक फूडमध्ये पोषक तत्त्व कमी असल्याने जाडेपणा वाढतो, कमी वयात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका आणि लिवर व इतर पचन अंगांना जंक फूड पचवण्यासाठी फार जास्त ऊर्जा आणि हार्मोनस स्त्राव करण्याची आवश्यकता असते. कारण या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतं.
बदलती जीवनशैली आणि शहरी जीवनशैली कमी झोप होण्याचं एक प्रमुख कारण आहे. कामाचा वाढता ताण, कामाच्या वाढत्या वेळा, नात्यांमधील अडचणी आणि इतरही समस्यांमुळे लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. तरुण जास्तीत जास्त वेळ सिनेमा बघण्यासाठी आणि रात्री पार्टी करण्यात वेळ घालवतात.
तज्ज्ञ सांगतात की, झोप कमी घेतल्याने तणावाचे हार्मोन रिलीज होतात. याने टेस्टोस्टेरोन कमी होतं. तसेच कमी झोपेमुळे हृदय रोग आणि जाडेपणाचा धोकाही वाढतो. इतकेच नाही तर कमी झोप घेतल्याने शरीराला अधिक जास्त ऊर्जेची गरज असते. अशात डायबिटीजचा धोका दुप्पट वाढतो.