जंक फूड, कलरिंग अन् तणावामुळे पडतेय टक्कल; ३० वर्षे वयातच येऊ लागल्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 07:08 AM2024-08-24T07:08:44+5:302024-08-24T07:10:06+5:30
तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे ४० वर्षांनंतर टक्कल पडण्याची समस्या आनुवंशिक प्रकरणांमध्ये निर्माण होते, परंतु आता मोठ्या संख्येने तरुणांना याचा त्रास होत आहे.
नवी दिल्ली : स्टायलिश लूकच्या नादात केसांना कलर करण्यापासून ते वारंवार स्ट्रेटनिंग करणे, तणाव आणि थायरॉइडचे आजार हे टक्कल पडण्याची कारणे ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे ४० वर्षांनंतर टक्कल पडण्याची समस्या आनुवंशिक प्रकरणांमध्ये निर्माण होते, परंतु आता मोठ्या संख्येने तरुणांना याचा त्रास होत आहे.
काही तरुणांचे केस समोरून तर काहींचे मागून गळत आहेत. ३० ते ४० वयोगटातील लोकांना टक्कल पडण्याची मोठी प्रकरणे सध्या समाेर येत आहेत. त्यामुळे तरुणांनी तणावासह नको त्या गोष्टी टाळणे गरजेचे झाले आहे.
केस गळतीची इतर कारणे
टक्कल पडण्याच्या इतर मुख्य कारणांमध्ये तणाव, संतुलित आहाराचा अभाव, हार्मोनल बदल, आनुवंशिक समस्या, प्रदूषण यांचा समावेश होतो. केस कमी होत असल्यास, त्यांची तपासणी करून आणि कारण शोधून समस्या सोडवली जाऊ शकते.
महिलांमध्येही समस्या : महिलांनाही टक्कल पडण्याच्या समस्येने ग्रासले आहे. तणाव, विस्कळीत दिनचर्या, अधिक प्रमाणात रंग देणे, स्टायलिंग आणि केमिकलमुळे केस कमकुवत होत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, औषधांच्या सेवनामुळे हार्मोनल असंतुलन देखील होत आहे.
या कारणांमुळे गळताहेत केस
- जंक फूडचे अतिसेवन
- प्रदूषित वातावरणाचा अतिरेक
- जास्त मानसिक किंवा शारीरिक ताण
- संतुलित पोषण आहाराचा अभाव
- जीवनशैलीतील बदलामुळे हार्मोनल संतुलन बिघडणे.
- थायरॉईड, पीसीओडी सारखे आजार
- कौटुंबिक इतिहास
- दारूचे सेवन
तरुणांमध्ये रंग देणे, स्ट्रेटनिंग मधील केमिकलमुळे होणारे नुकसान, फंगल इन्फेक्शन, अधिक तणाव, हार्मोनचे असंतुलन, ऑटो इम्यून डिसऑर्डर अशा कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या वाढत आहे. पुरुषांबरोबरच महिलांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण वाढत आहे. - डॉ. सृष्टी त्रिपाठी, त्वचारोग तज्ज्ञ