सावधान! हिवाळ्यात हिटरचा वापर केल्याने होतं 'हे' नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:25 AM2019-01-18T10:25:18+5:302019-01-18T10:27:27+5:30
गरमी सुरु झाली की ज्याप्रमाणे फॅन आणि एसीची गरज भासते, त्याचप्रमाणे हिवाळ्यात आता हिटरची चलती सुरु झाली आहे.
पूर्वी हिवाळा म्हटलं की, घराबाहेर, चौकात शेकोटी पेटवून सगळेजण शेक घेत असत. अजूनही काही ठिकाणी हे बघायला मिळतं. पण आता काही इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर शेकोटी म्हणून किंवा घरात गरम वातावरण ठेवण्यासाठी केला जातो. पण जसे याचे काही फायदे आहेत तसेच काही नुकसानही आहेत.
गरमी सुरु झाली की ज्याप्रमाणे फॅन आणि एसीची गरज भासते, त्याचप्रमाणे हिवाळ्यात आता हिटरची चलती सुरु झाली आहे. पूर्वी किंवा अजूनही काही भागांमध्ये लोक शेकोटी पेटवून हिवाळ्यात गरमी घेतात. पण आता इलेक्ट्रिक हिटर वापरण्याचा ट्रेन्ड आला आहे. अनेकजण बाथरुममधून बाहेर आल्यावर हिटरसमोर उभे राहतात. तसेच अनेकजण हिवाळ्यात रात्री हिटर सुरु ठेवूनच झोपतात. तुम्हीही अशाप्रकारे इनडोअर हिटरचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण हिवाळ्यात अशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक हिटरचा वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
श्वास गुदमरण्याची समस्या
इलेक्ट्रिक हिटर रुममधील हवेत असलेला दमटपणा शोषूण हवा कोरडी करतं. अशात ज्या लोकांना आधीच श्वासासंबंधी समस्या आहेत, त्यांना सफोकेशन म्हणजे श्वास गुदमरण्याची समस्या होऊ लागते. यापासून बचाव करण्यासाठी हिटर वापरत असताना रुममध्ये एक बकेट पाणी भरुन ठेवले पाहिजे. सोबतच खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद करु नये. थोडी हवा येऊ देणे गरजेचे आहे.
त्वचा कोरडी होते
आधीच सांगितल्या प्रमाणे हिटर सुरु करताच त्यातून येणाऱ्या गरम हवेमुळे रुममधील हवेतील ओलावा पूर्णपणे नाहीसा होतो आणि हवा कोरडी होते. त्यामुळे या गरम आणि कोरड्या झालेल्या हवेमुळे त्वचा कोरडी होते. खासकरुन लहान मुलांच्या त्वचेला याचा जास्त फटका बसतो. कारण लहान मुलांची त्वचा जास्त संवेदनशील असते.
शरीरातील तापमानात चढ-उतार
तुम्ही एकदा रुममध्ये इलेक्ट्रॉनिक हिटर लावून बसतो तेव्हा तुमच्या शरीरातील तापमान स्वत:ला त्या हिशोबाने अॅडजस्ट करतं. तेच रुममधून बाहेर गेल्यावर अचानक शरीराच्या तापमानात बदल होतो. शरीरातील तापमान अशाप्रकारे कमी जास्त होत असेल तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता वाढते.
जखम किंवा भाजण्याचा धोका
जर इलेक्ट्रॉनिक हिटर लावून तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही किंवा हवी ती काळजी घेतली नाही तर त्याने तुम्हाला जखम होण्याचा किंवा भाजण्याचाही धोका असतो. खासकरुन लहान मुलांना आणि वयोवृद्धांसोबत असं होण्याचा धोका अधिक असतो.