झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करत असाल तर सावधान; तुमच्या आरोग्यासाठी ठरेल घातक
By प्रविण मरगळे | Published: December 14, 2020 09:00 AM2020-12-14T09:00:40+5:302020-12-14T09:07:59+5:30
रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर करणे यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत
दिवसभर काम केल्यानं तुमच्या डोळ्यांना आराम मिळत नाही, त्यानंतरही रात्री झोपताना तुम्हाला मोबाईल वापरल्याशिवाय जमत नाही, अनेकजण रात्री मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यतून पाणी येणे अशाप्रकारच्या अनेक समस्या उद्भवतात. जेव्हापासून जग इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जवळ आलं, तेव्हापासून मोबाईलचा अतिवापरही वाढू लागला. लोक जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर वेळ घालवू लागले. मग ते कामासाठी असो वा टाईमपाससाठी.
पण सावधान, आवश्यकतेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर तुमच्या शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. अनेकदा दिसून येते की, काहीजण आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस सर्वात जास्त ठेवतात. रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर करणे यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत, स्मार्टफोनचा ब्राईटनेस आणि वारंवार मोबाईलच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असतो ज्यामुळे डोळे लवकर खराब होतात. इतकचं नाही तर हळूहळू बघण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि डोकं दुखण्याचं त्रास सुरु होतो.
डोळे सुकू लागतात
दिवसभर काम करत असल्याने आपल्या डोळ्यांना आराम मिळत नाही, अशातच रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापर केल्याने आपले डोळे सुकू लागतात. डोळ्यांना सूज येण्याची शक्यता असते. वारंवार असं झाल्याने डोळे जळजळतात. डोळ्यांच्या मोतीबिंदूवर त्याचा विपरित परिणाम होतो. सतत फोनच्या वापरामुळे डोळ्यातून पाणी येऊ लागते, मोबाईलमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी खूप नुकसानकारक असतो. नेहमी मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांच्या पापण्या झपकण्याची प्रक्रिया धीमी होते, त्यामुळे डोळे सुजतात आणि डोके दुखू लागते.