सावधान! या ५ गोष्टी तुमची झोप कायमची उडवतील!
By admin | Published: May 17, 2017 05:46 PM2017-05-17T17:46:31+5:302017-05-17T17:46:31+5:30
आपली झोप उडवून शारीरिक-मानसिक आजारांना निमंत्रण नक्की कोण देतंय?
- निशांत महाजन
जगभरात माणसांना सध्या झोपेची समस्या सतावते आहे. आपण कुणीही त्याला अपवाद नाही. शांत, सात ते आठ तास गाढ झोप ही तर आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते अनेकांना. रात्रीचे बारा वाजून जातात तरी लोक झोपत नाहीत. काही झोपतात पण त्यांना झोपच येत नाही. काहींना अचानक जाग येते, विचित्र स्वप्न पडतात, भीती वाटते, दचकून जाग येते, उद्या करायच्या कामांची यादी सतत डोक्यात फिरते. शांत झोपच लागत नाही. असं तुमचं होतंय का? होत असेल तर बाकी स्ट्रेस, कामाचा लोड, लाइफस्टाईल यासह हे तपासून पहा की झोपण्यापूर्वी आपण काय करतो? काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपण झोपताना करतो आणि त्यामुळेही आपली झोप उडते. आपल्या झोपेचं चक्र बिघडतं. आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकार होवू शकतात. अनेकदा झालेलेही असतात पण आपल्या लक्षात येत नाही. तसं होवू नये म्हणून झोपताना या ५ गोष्टी टाळा. तुमची झोप नक्की ताळ्यावर येईल.
१) झोपण्यापूर्वी चहा-कॉफी?
हल्ली फॅशनच आहे, जेवण झाल्यावर कॉफी पिण्याची. पण फॅशन घातक असू शकते. ठरते. झोपण्यापूर्वी जर चहा-कॉफी घेत असाल तर त्यानं तुमची झोप उडते. पचन क्रिया बिघडते. सकाळी पोट साफ होणं अवघड. डोकेदुखी त्रास देते. आणि झोप धड न लागल्यानं सकाळी चिडचिड होते, भूकेवर परिणाम होतो.
२) टीव्ही/मोबाईल/कम्प्युटर/व्हॉट्सअॅप- ३० मिनिटं आधी बंद
अंथरुणात पडल्यापडल्या फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलणं, बेडरुममध्ये टीव्ही पाहणं, व्हॉट्सअॅप गप्पा, कम्प्युटरवर काम हे सारं जर तुम्ही करत असाल तर तुमची झोप उडणारच. मेंदू शांत होणारच नाही. ते टाळायचं तर झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटं आधी हे सारं बंद करुन लांब ठेवून द्या. मोबाईल उशाशी ठेवणं आणि रात्री जाग आल्यावर तो उघडून पाहणं हे तर महाघातक.
३)तुडूंब जेवण, लगेच झोप?
रात्रीचं जेवण कमीच करा. आणि जेवण झाल्या झाल्या काहीजण लगेच झोपायला जातात. हात धुतला की गेलेच झोपायला. ते टाळा. जेवणानंतर किमान तासाभरानं झोपा. अतीजेवण रात्री करणं चूकच.
४) लाईट आॅन, झोप गॉन!
रात्री झोपण्यापूर्वी किमान तासभर आधी घरातले मोठे दिवे बंद करा. मंद दिवे लावा. शांत प्रकाश, शांत-तरल म्युझिक, असं काही ऐका. तर झोप छान लागेल. भकभकीत दिवे जे रात्री बारापर्यंत चालू ठेवतात त्यांचा झोपेचा पॅटर्न हमखास बिघडतो.
५) स्मोक करताय?
झोपण्यापूर्वी एक सिगारेट अशी सवय अनेकांना असते. ती मोडा. सिगारेट ओढायची की नाही हा वेगळ्या चर्चेचा विषय. मात्र रात्री झोपण्यापूर्वी सिगारेट पिणं हे मेंदूला त्रासदायक असतंच. ते टाळा.