Maharashtra: सावधान! राज्यावर व्हायरलचे संकट; महिनाभरात वाढले साथीच्या आजारांचे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:22 AM2021-11-04T09:22:41+5:302021-11-04T09:23:19+5:30
मुंबईत मृत्यूचे प्रमाण मात्र घटले; व्हायरलची लक्षणे वेळीच ओळखण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २५४ रुग्ण आढळले असून, गेल्या वर्षी याच महिन्यात डेंग्यूचे फक्त १५ रुग्ण सापडले होते. तर, एकाचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र, पावसाळी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. पालिकेने आतापर्यंत फक्त ७ मृत्यू नोंदले आहेत. त्यात लेप्टोच्या ४ आणि डेंग्यूच्या ३ मृत्यूंचा समावेश आहे. तसेच मलेरियाचे रुग्ण वाढले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यात ३५७ मलेरिया रुग्ण आढळले होते. तर, जुलै अखेरच्या आठवड्यात मलेरियाचे ५५७ रुग्ण नोंद झाल्याने चिंता वाढली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ५७६, गॅस्ट्रोचे २४७, लेप्टो ३२, डेंग्यू २५४, कावीळ ४१, चिकनगुनियाचे ३३ तर, ८ रुग्ण एचवनएनवनचे आढळले आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, प्रत्येक विभागात साथरोगबाबत जागरूकता वाढवली आहे. तसेच साथरोगाचे सर्वेक्षण, निदान आणि उपचारांवर भर देण्यात आला आहे. शिवाय, प्रत्येक रुग्णालय आणि दवाखान्यांना रक्त तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकरणांमुळे आता पालिका रुग्णालयातील बेड्स भरू लागले आहेत. विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्टोबरमध्ये दररोज सरासरी १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. मलेरियाचीही तीच स्थिती आहे. ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे दररोज २१ रुग्ण आढळत होते. या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयातील खाटा आरक्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात चिकनगुनियाचे फक्त ७ रुग्ण सापडले होते. मात्र, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत चिकनगुनियाचे एकूण ३३ रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये चार पटीने वाढ झाली आहे.
लसीकरण...
आतापर्यंत राज्यात एकूण ९ कोटी ८७ लाख ९३ हजार ८७४ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी २ लाख ६० हजार ४८३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ३ कोटी ६८ लाख ५४ हजार २०० लाभार्थ्यांनी पहिला, तर १ कोटी २१ लाख ५४ हजार ६२७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ७२ लाख ३८ हजार ३९० लाभार्थ्यांनी पहिला, तर १ कोटी ६१ लाख ३९ हजार ९१० लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १२ लाख ९३ हजार ९०६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ११ लाख १९ हजार २६३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४६ हजार ५१९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १८ लाख ४७ हजार ०५९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.