दिवसाची सुरुवात करा बीट ज्यूसने; ताजेतवाने रहाल अन् रोगांनाही दूर ठेवाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:14 PM2021-05-12T14:14:42+5:302021-05-12T15:20:25+5:30
नुसतं बीट खायला दिलं तर तोंड वाकडंं केलं जातं. पण तुम्ही बीटाचा ज्युस प्यायलात तर तो चविष्ट तर लागतोच पण त्याचे फायदे अगणित आहेत.
गडद गुलाबीरंग, भरपूर जीवनसत्वांनीयुक्त बीट म्हणजे कंदमुळ वर्गातील भाज्यांचा जणू राजाच. अनेकदा नुसतं बीट खायला दिलं तर तोंड वाकडं केलं जातं. पण तुम्ही बीटाचा ज्यूस प्यायलात तर तो चविष्ट तर लागतोच पण त्याचे फायदे अगणित आहेत.
बीटामध्ये लोह, जीवनसत्व अ,बी ६ आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे बीटाचे अन्नातील महत्त्व कैक पटीने जास्त आहे. यातील विविध घटकांमुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात. यामुळे लीवरला सूज येण्याचा धोका टळतो.
पाहा बीटाचा ज्यूस तयार करण्याची कृती
सर्व प्रथम बीट घ्या
त्याचा वरील भाग कापून त्याची साले काढून टाकावीत.
त्यानंतर त्याचे तुकडे करावेत आणि ब्लेंडरमध्ये ज्युस होईपर्यंत फिरवून घ्यावे.
नंतर हे ज्युस चाळणीने गाळून घ्यावे.
चवीसाठी तुम्ही यात लिंबूही घालू शकता.
बीट ज्युसचे फायदे
तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो
तज्ज्ञांच्या मते रोज २५० मिली बीटाचा ज्युस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. बीटामध्ये नायट्रेट असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
वजन नियंत्रित राहते
बीटात कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात आणि फॅट तर बिलकूल नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या सकाळची सुरवात बीटाच्या ज्युसने करू शकता आणि दिवस ताजातवाना घालवू शकता.
स्टॅमिना वाढवते
व्यायाम व इतर शारीरीक शक्तीची कामे करताना स्टॅमिना उत्तम असणे गरजेचे आहे. बीटाचा ज्युस नेमके हेच कार्य करते.
पोटॅशिम आणि विविध खनिजांनीयुक्त
आपल्या शरिरातील पोटॅशिअम कमी झाले की थकवा, चक्कर येणे, क्रॅम्प्स येणे असे प्रकार होतात. बीटात पोटॅशिअम मोठ्याप्रमाणात असते त्यामुळे बीट ज्युस प्रचंड फायदेशीर ठरतो. यातील खनिजांमुळे रक्तवाहिन्या आणि मांसपेशींचे कार्य सुरळीत चालू राहते.