लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:55 PM2024-06-13T15:55:38+5:302024-06-13T15:59:40+5:30
आपल्या मुलांना कोल्ड ड्रिंक्स देण्याआधी, त्याचे तोटे जाणून घेणं आवश्यक आहे.
उष्णता वाढली की कोल्ड ड्रिंक्सची मागणी देखील वाढते, पण कोल्ड ड्रिंक्स विशेषतः लहान मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामध्ये तुम्हाला ताजेतवाने वाटणारे घटक असू शकतात, परंतु त्यांचं नियमित सेवन आरोग्यासाठी चांगलं नाही. आपल्या मुलाला कोल्ड ड्रिंक्स देण्याआधी, त्याचे तोटे जाणून घेणं आवश्यक आहे.
लठ्ठपणाचा धोका
कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. तसेच, त्यात कोणतेही पौष्टिक घटक नसतात, ज्यामुळे मुलांना आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेचा त्रास होऊ शकतो.
दातांचं नुकसान
कोल्ड्रिंक्समध्ये असलेली साखर आणि एसिड दात कमकुवत करू शकतात. ज्यामुळे दात किडतात आणि वेदना होऊ शकतात.
पचनासंबंधित समस्या
कोल्ड ड्रिंक्समुळे पचनक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे मुलांमध्ये पोटदुखी, गॅस किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते.
हाडं कमकुवत होणं
कोल्ड ड्रिंक्समध्ये कमी कॅल्शियम असतं, जे हाडांच्या विकासासाठी आवश्यक असतं. याच्या नियमित सेवनाने मुलांची हाडं कमकुवत होऊ शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता
कोल्ड ड्रिंक्समुळे थोड्यावेळासाठी ताजेतवानं वाटू शकतं, परंतु ते शरीराला हायड्रेट करत नाहीत. शरीराला पाण्याची कमतरता भासते.
मुलांना पिण्यासाठी काय द्यायचं?
मुलांना कोल्ड ड्रिंक्सऐवजी साधं पाणी, ताजी फळे, फळांचा रस, नारळ पाणी किंवा ताक देणं अधिक फायदेशीर ठरतं. मुलांना हायड्रेटेड ठेवण्यासोबतच यातून आवश्यक पोषणही मिळतं.