मातीच्या तव्यावरील चपाती खाण्याचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:14 PM2018-10-16T12:14:52+5:302018-10-16T12:15:48+5:30
प्राचीन काळापासून मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाण्यात येते. धातूंचा शोध लागेपर्यंत मानव मातीच्या भांड्याचाच वापर करत असे. परंतु धातूंचा शोध लागल्यानंतर मातीच्या भाड्यांऐवजी धातूंच्या भांड्यांचा वापर करण्यात येऊ लागला.
प्राचीन काळापासून मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाण्यात येते. धातूंचा शोध लागेपर्यंत मानव मातीच्या भांड्याचाच वापर करत असे. परंतु धातूंचा शोध लागल्यानंतर मातीच्या भाड्यांऐवजी धातूंच्या भांड्यांचा वापर करण्यात येऊ लागला. आता अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या धातूंपासून तयार करण्यात आलेली भांडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण याच भांड्यांसोबत हल्ली बाजारामध्ये मातीपासून तयार करण्यात आलेली भांडीसुद्धा दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे अनेक लोक यांचा वापर देखील करू लागली आहेत.
आर्युवेदातही मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवण्याचे फायदे सांगण्यात आलेले आहेत. घरामध्ये बऱ्याचदा जेवण तयार करण्यासाठी अॅल्युमिनिअम आणि स्टिलच्या भांड्यांचा वापर करण्यात येतो. अनेकदा तज्ज्ञांकडूनही सांगितलं जातं की, जेवण आगीवर हळूहळू शिजवणं गरजेचं असतं. कारण यामुळे त्यातील पोषक तत्व नष्ट होत नाहीत आणि पदार्थ अधिक चवदार होतो. जाणून घेऊयात मातीच्या तव्यावरील चपाती खाल्याने शरीराला होणारे फायदे...
चवदार आणि पौष्टिक अन्न
मातीच्या भांड्यांमध्ये शिजवण्यात आलेले अन्न रूचकर आणि पौष्टिक असते. मातीच्या तव्यावर ज्यावेळी चपाती भाजली जाते त्यावेळी मातीतील पोषक तत्व चपातीमध्ये शोषली जातात. त्यामुळे चपातीची पौष्टिकता वाढते. याचसोबत यामध्ये असलेले सर्व प्रकारचे प्रोटिन शरीराचं अनेक गंभीर आजारांपासून रक्षण करतं.
बद्धकोष्ठापासून सुटका
धावपळीचं दैनंदिन जीवन आणि बदलती जीवनशैली यांमुळे फार कमी वयापासूनच अनेक व्यक्तींना बद्धकोष्ठाची समस्या होते. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास असतो, अशा व्यक्तींनी मातीच्या तव्यावर भाजण्यात आलेली चपाती खाल्याने आराम मिळतो. त्याचप्रमाणे पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात.
गॅसच्या समस्येपासून सुटका
दिवसभर बैठं काम असणारी लोक गॅसच्या समस्येमुळे त्रस्त असतात. मातीच्या तव्यावर भाजण्यात आलेली चपाती खाल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
1. मातीचा तवा कधीही गॅसच्या जास्त आचेवर ठेवू नका, त्यामुळे तवा फूटू शकतो.
2. तव्याचा वापर करण्याआधी त्यावर पाणी लावा.
3. मातीचा तवा धुताना त्यावर कधीही साबण लावू नये कारण साबण तव्यामध्ये शोषला जातो.
4. तवा कापडाने स्वच्छ करावा.
मातीचा तवा का फायदेशीर ठरतो?
असं म्हटलं जातं की, मातीच्या तव्यावर चपाती भाजल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होत नाही. तेच जर दुसऱ्या एखाद्या तव्यावर तयार केल्या तर त्या चपातीमधील सर्व पोषक तत्व नष्ट होतात. अॅल्युमिनिअमच्या भांड्यामध्ये तयार करण्यात आलेल्या जेवणातील 87 टक्के पोषक तत्व नष्ट होतात. पितळेच्या भांड्यामध्ये तयार करण्यात आलेल्या पदार्थातील 7 टक्के पोषक तत्व नष्ट होतात. परंतु मातीच्या भांड्यामध्ये शिजवण्यात आलेल्या पदार्थातील कोणतेही पोषक तत्व नष्ट होत नाहीत.