फक्त बीपी, वेट लॉस नाही; तर अनेक गंभीर समस्यांवर फायदेशीर ठरतं कलिंगड खाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:40 AM2020-04-21T10:40:14+5:302020-04-21T10:47:03+5:30
कलिंगडाचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.
(image credit- mayo clinic health,mashed)
उन्हाळ्यात शरीरातील वाढतं तापमान कमी करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा आहारात समावेश केला जातो. उन्हाळ्यात कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतात. वेगवेगळ्या आकारात असलेले कलिंगड शरीराला पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
वरुन टणक दिसणा-या कलिंगडात पाणीच पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात ते आवर्जून खायला हवं. पण या कलिंगडाचे आणखीही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्हाला माहितही नसेल पण कलिंगडाचा आहारात समावेश करून तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.
हृदयाच्या आजारांसाठी
हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड उत्तम उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते. ब्लॉकेजची समस्या यामुळे उद्भवत नाही. अनेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर कलिंगड खाण्याची पध्दत आहे. तुम्हीसुद्धा जेवण झाल्यानंतर कलिंगड खाऊ शकता.
शरीर हायट्रेट राहतं
कलिंगडात पाणी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचं सेवन लाभदायक ठरतं. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगडाचा आहारात समावेश करावा. कलिंगड ७८% भाग हा गराचा असल्याने ते खाद्य आणि पेय दोन्ही आहे.
वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर डाएटमध्ये कलिंगडाचा समावेश करा. कलिंगडातल्या पाण्यानं पोट भरतं. भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं वजनही वाढत नाही.
केस, त्वचेसाठी
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे तुमची त्वचा मऊ आणि केस मजबूत होतात. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. यासाठीच सौंदर्याची काळजी घेण्यासाठी नियमित कलिंगड खाणं तुमच्या लाभदायक ठरू शकतं.
पचनाच्या समस्या आणि रक्तदाब
कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड उपयोगी फळ आहे.