रोज एक आवळा खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे; वजनही होईल कमी आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:19 PM2024-07-18T16:19:06+5:302024-07-18T16:23:48+5:30
दररोज फक्त एक आवळा खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. हे फक्त एक आंबट फळ नसून पोषक तत्वांचा खजिना आहे. आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत. दररोज फक्त एक आवळा खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.
इम्यूनिटी वाढते
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, जे शरीराची इम्यूनिटी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. मजबूत इम्यूनिटी सर्दी आणि ताप यांसारख्या किरकोळ आजारांपासून तुमचं रक्षण करते. शिवाय एखाद्या ठिकाणी जखम झाल्यास ती भरण्यासही मदत होते.
पचनक्रिया नीट राहते
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट साफ राहतं.
दृष्टी सुधारते
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील आढळतं, जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आवळा रोज खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
केस जाड आणि चमकदार होतात
आवळा केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट केसांचं पोषण करतात आणि त्यांना गळण्यापासून रोखतात. याशिवाय केस जाड, मजबूत आणि चमकदार बनवतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त
आवळा खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढतं. यातील फायबरमुळे तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि वजन कमी करण्यास मदत देखील होते.
कसा खायचा आवळा?
आवळ्याचं अनेक प्रकारे सेवन करता येऊ शकतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तो कच्चा खाऊ शकता किंवा आवळ्याचा मुरांबा, लोणचं, ज्यूस बनवून सेवन करू शकता. जास्तीत जास्त फायदे हवे असल्यास कच्चा आवळा खाणं हे सर्वोत्तम मानलं जातं.