हाताची नखं एकमेकांवर घासल्याने होतात अनेक फायदे, 'या' आजारापासून मिळते सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:50 PM2022-02-21T17:50:22+5:302022-02-21T17:55:01+5:30
केसांच्या समस्या कमी होण्यासाठी हातांच्या बोटांची नखं एकमेकांवर घासण्याचा हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे करू शकता.
धावपळीची जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव आणि ताण-तणावांमुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे फिटनेसकडे लोकांचा कल वाढला आहे. फिटनेससाठी लोक डाएट, व्यायाम, योगासनं, मेडिटेशन आदी पर्याय निवडतात. सध्याच्या काळात काही कारणांमुळे लोकांमध्ये केसांविषयीच्या समस्या (Hair Problems) देखील वाढत आहेत.
अकाली टक्कल पडणं, केस पांढरे होणं, केस पातळ होणं अशा समस्यांचा यात समावेश आहे. केसांच्या समस्या रोखण्यासाठी बरेच लोक विविध प्रकारची तेलं, सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. काही लोक अगदी वैद्यकीय उपचार घेतात. पण त्यातून अपेक्षित फरक दिसतोच असं नाही. केसांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी अॅक्युप्रेशर थेरपी (Acupressure Therapy Hair) तसेच योगा थेरपीमध्ये नखांविषयीचा एक सोपा उपाय सांगितला गेला आहे. केसांच्या समस्या कमी होण्यासाठी हातांच्या बोटांची नखं एकमेकांवर घासण्याचा हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे करू शकता.
जगभरातील योगगुरू केसांच्या समस्या कमी होण्यासाठी दोन्ही हातांची नखं एकमेकांवर घासण्याचा सल्ला देतात. याला बालायाम अर्थात केसांसाठी व्यायाम असंही म्हणतात. नखं एकमेकांवर घासण्याची पद्धत ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. अॅक्युप्रेशर थेरपीमध्येही या पद्धतीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. चुकीचा आहार, दूषित पाणी आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस गळणं (Hair Fall), केस पातळ होणं, टक्कल पडणं (Baldness) आणि अकाली केसं पांढरे होणं यांसारख्या समस्या निर्माण होताना दिसतात.
मात्र दोन्ही हातांची नखं एकमेकांवर घासल्यास या समस्या दूर होऊ शकतात. मात्र, गर्भवती महिलांना बालायाम करणं टाळावं कारण असं केल्यास गर्भाशयात आकुंचन निर्माण होऊ शकतं. तसेच हाय ब्लडप्रेशरचा (High Blood Pressure) त्रास असणाऱ्यांनी नखं एकमेकांवर घासणं टाळावं, असं तज्ज्ञ सांगतात.
बालायाम करताना तुम्ही दोन्ही हात छातीजवळ न्या आणि बोटं आतल्या बाजूस आणा. त्यानंतर नखं एकमेकांवर घासा. शक्य आहे तितका वेळ ही क्रिया करावी. अपेक्षित फरक पडावा यासाठी अंगठयाची नखं एकमेकांवर घासू नयेत. जर तुम्ही ही क्रिया रोज किमान 5 ते 10 मिनिटं केली तर त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
बालायाम केल्यानं टक्कल पडणं, केस गळणं, केस पातळ आणि पांढरे होण्याच्या समस्या दूर होतात. नखं एकमेकांवर वारंवार घासल्यानं त्वचा विकार दूर होऊ शकतात. बालायाम केल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे चेहरा तजेलदार होतो आणि शरीरात ताकद येते. जरी तुमचे केस जास्त प्रमाणात गळाले असतील, तरी बालायामामुळे त्यांची पुन्हा वाढ होऊ शकते.