उन्हाळ्यात सब्जाचं जास्त सेवनही ठरू शकतं त्रासाचं; वैद्यांनी दिला याबाबत खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 03:57 PM2024-04-02T15:57:36+5:302024-04-02T15:58:05+5:30
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. पण काहींना सब्जाच्या अतिसेवनाने त्रासही होऊ शकतो. तेच जाणून घेऊ..
उन्हाळा आता जास्तच जाणवायला लागला आहे. यामुळे गरमी आणि घामामुळे लोक हैराण असतात. अशात शरीर थंड करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पेयांचं सेवन करतात. या दिवसांमध्ये सब्जा खाण्याचे किंवा पिण्याचे भरपूर फायदे सांगितले जातात. कारण सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.
सरबत, फालुदा, कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये सब्जा खाता येतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. पण सब्जा सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो असं नाही. काही लोकांसाठी सब्जाचं सेवन त्रासाचं ठरू शकतं. आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
1) उन्हं वाढत असल्याने शरीराला थंडावा म्हणून कित्येकजण सब्जा खात आहेत. सध्या वसंत ऋतू सुरू आहे. हा निसर्गतः कफ वाढण्याचा काळ असल्याने नियमितपणे सब्जा खाणाऱ्यांना सर्दी खोकल्याचे त्रास बळावू शकतात.
2) सब्जा हा पचायला जड आहे. नियमितपणे खाल्ल्यास उन्हामुळे आधीच कमी झालेली भूक आणखीच मंदावते. त्यामुळे जे नियमित व्यायाम करतात, ज्यांची भूक आणि पचनशक्ती उत्तम आहे त्यांनी खाण्यास हरकत नाही. इतरांनी मात्र; क्वचित् कधीतरी आणि कमी मात्रेत सेवन करणंच योग्य.