वजन कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम
By शिवराज यादव | Published: August 11, 2017 06:21 PM2017-08-11T18:21:00+5:302017-08-11T18:22:49+5:30
वजन कमी करताना चालण्याचं ठिकाण आणि शरिराच्या वजनाकडेदेखील लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे
मुंबई, दि. 11 - अनेकांना वजन कमी करायचं आहे, पण जीममध्ये जाण्याचा कंटाळा येत असतो. खूप काही खाण्याची इच्छा असते मात्र वजन वाढेल म्हणून त्याकडे कानाडोळा करायचा. वजन वाढलेलं असणारी प्रत्येक व्यक्ती अजिबात मेहनत न करता वजन कमी कसं करता येईल याचे फंडे शोधत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का चालणे हा वजन कमी करण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये वजन उचलण्याची, धावण्याची मेहनत घेण्याचीही गरज नाही. पण चालतानादेखील काही नियम पाळणं गरजेचं असतं.
वजन कमी करताना चालण्याचं ठिकाण आणि शरिराच्या वजनाकडेदेखील लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही एका तासात 4 किमी अंतर चालत असाल तर किमान 400 कॅलरीज कमी होतात.
अनेकदा चालताना आपण ठिकाण ठरवलेलं असत. या एखाद्या ठिकाणापासून ते त्या टोकापर्यंत. पण जर रस्ता बदलला तर...अशावेळी पेडोमीटरचा वापर करा. यामुळे तुम्हाला नेमकं समजेल की आपण किती चाललो आहोत, आणि केव्हा थांबायचं आहे.
वजन कमी करण्यासाठी किती चालणं गरजेचं आहे असा प्रश्न नक्की पडला असेल.
- एक किमी म्हणजे 2000 पाऊलं जर तुम्ही चाललात तर 100 कॅलरीज कमी होतात.
- 3500 कॅलरीज म्हणजे एक पाऊंड
- याचा अर्थ एका आठवड्यात एक पाऊंड वजन कमी करायचं असेल तर दिवसाला 500 कॅलरीज कमी होतील इतकं चालणं गरजेचं आहे.
तुम्ही आता नियमित चालण्याचा विचार करत असाल तर दिवसाला 15 ते 20 मिनिटे आणि आठवड्यातून तीन दिवस चालण्यापासून सुरुवात करा. त्यानंतर वेळ वाढवून 30 ते 60 मिनिटांपर्यंत नेऊ शकता. चालणे हा व्यायाम म्हणून करणार असाल तर अगोदर आपल्या डॉक्टरशी नक्की संपर्क साधा, आणि आपण यासाठी फिट आहोत की नाही याची माहिती घ्या.