मुलांना कफ सिरप देताय? सावधान!
By संतोष आंधळे | Published: December 20, 2022 06:20 AM2022-12-20T06:20:24+5:302022-12-20T06:20:41+5:30
डॉक्टरांच्या नातवावर दुष्परिणाम; वेळीच धावपळ केल्याने वाचले प्राण
मुंबई : प्रत्येक घरात कफ सिरप असते. सर्दी-पडसे आणि खोकला झाल्यावर त्याचा हमखास वापर केला जातो; मात्र हेच कफ सिरप लहानग्यांसाठी घातक ठरत असल्याचे वास्तव आहे. दक्षिण मुंबईतील एका नामांकित डॉक्टरांच्या अडीच वर्षांच्या नातवाबाबत हा प्रकार घडला. सुदैवाने वेळीच उपचार केल्याने बाळाचे प्राण वाचले; या निमित्ताने कफ सिरपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडमध्ये गावदेवी येथे एक नामांकित डॉक्टर राहतात. त्यांच्या अडीच वर्षांच्या नातवाला खोकला येत असल्याने १५ डिसेंबर रोजी त्याला कफ सिरप देण्यात आले; मात्र औषध दिल्यानंतर काही मिनिटांतच बाळ एकदम शांत झाले. त्याचे अंग थंड पडले. चेहऱ्यावरील रंग निळसर होत गेला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने बाळास सीपीआर देण्यास सुरुवात केली. हाजी अली येथील लहान मुलांच्या रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आले. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने बाळाचे प्राण वाचले. अनेकदा लहान मुलांना खोकला झाला की त्यास कफ सिरप देण्याचा सल्ला दिला जातो. काही वेळा तर पालक स्वतःहूनच बाळांना सिरप देतात; मात्र अशा पद्धतीने सिरप दिल्यास धोके संभवतात असे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संबंधित डॉक्टर म्हणाले की, चार वर्षांखालील बाळांना कफ सिरप देण्यास अमेरिकेत मनाई आहे. भारतात लहान मुलांना कफ सिरप कसे दिले जाते, याचे आश्चर्य वाटते. यासंदर्भात डॉक्टर आणि पालकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.
सीपीआर म्हणजे काय ?
कार्डिओपल्मोनरी रिससायटेशन (सीपीआर) ही प्राथमिक उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते.
एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी काही काळाकरिता त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास किंवा रक्ताभिसरण थांबते.
त्यावेळी त्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हाताने दाब देऊन पंपिंग केले जाते. अनेकदा सीपीआरच्या माध्यमातून रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
तीन वर्षांखालील मुलांना कफ सिरप दिले जात नाही. कारण त्याचा फारसा परिणाम होत नाही. हे सिरप दिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता अधिक असते. बाळांना सुस्ती येऊ शकते. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सतर्क राहायला हवे.
डॉ. विजय येवले,
बालरोग तज्ज्ञ आणि राज्य बाल कोरोना कृती दलाचे सदस्य.
लहान मुलांना शक्यतो कफ सिरप देत नाही. औषधाचा फायदा आणि त्याचे दुष्परिणाम या दोघांची तुलना केली तर लहान मुलांना औषध देऊ नये. तसेच दिवसातून एखाद्या मुलास १५-२० वेळा खोकला येत असेल तर कफ सिरप देऊ नये. एखाद्या मुलास तासाभरात ५०- ६० वेळा खोकला येत असेल तर त्यास क्वचितप्रसंगी कफ सिरप देऊन त्याला काही आराम पडतोय का, हे पाहण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही; मात्र त्या आजाराची तेवढी तीव्रता आहे की नाही हे तपासले पाहिजे. डॉक्टरांनी योग्य निदान करून मग निर्णय घ्यावा.
- डॉ. राजेश चोखणी,
अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष.