मोठी घोषणा! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या ४ हजार जागांची भरती करणार, सरकारची विधानसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:11 PM2022-12-21T12:11:23+5:302022-12-21T12:11:52+5:30
Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे
नागपूर-
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं महत्वाची घोषणा केली आहे. राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गिरीश महाजन यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केली.
"आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची भरती केली. पण सध्या २८ टक्के जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती केली जाईल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो", असं गिरीश महाजन म्हणाले. तसंच राज्य आत्तापर्यंत १० टक्के हॉस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होतं, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलून आता ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल, अशीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल, असंही महाजन म्हणाले.
२०२४ पर्यंत जेजे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल
राज्यात १० हजार खोल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी बांधण्याची गरज असून आम्ही सीएसअरच्या माध्यमातुन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं महाजन म्हणाले. २०२४ पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत असल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. तसेच रिचर्ड अँड क्रुडास येथील जागा जी ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत २० वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जे.जे. ला मिळाली तर मोठा फायदा होईल. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल, असंही महाजन म्हणाले.