मोठी बातमी! मानवी शरीरात डुकराच्या किडनीचं यशस्वी ट्रान्सप्लांट, डॉक्टरांना मिळालं मोठं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:33 PM2021-10-20T13:33:51+5:302021-10-20T13:34:44+5:30
मानवी शरीरात डुकराची किडनी चांगल्याप्रकारे काम करत आहे. शरीरात इम्यून सिस्टीमने तात्काळ डुकराचा हा अवयव नाकारला नाही.
मेडिकल सायन्सच्या दुनियेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. डॉक्टरांना मानवी शरीरात डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात मोठं यश मिळालं आहे. या ऐतिहासिक यशानंतर मानव शरीरात ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी मानवी अवयवांची गंभीर कमतरता दूर केली जाऊ शकते. अनेक टेस्टनंतर डॉक्टरांचं मत आहे की, मानवी शरीरात डुकराची किडनी चांगल्याप्रकारे काम करत आहे. शरीरात इम्यून सिस्टीमने तात्काळ डुकराचा हा अवयव नाकारला नाही.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, हे ऐतिहासिक यश अमेरिकेतील डॉक्टरांना मिळालं आहे. किडनी ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रक्रिया न्यूयॉर्क सिटीमध्ये एनवाययू लॅंगन हेल्थ सेंटरमध्ये करण्यात आली. डॉक्टर म्हणाले की, ट्रान्सप्लांटआधी डुकराचे जीन बदलण्यात आले होते. जेणेकरून मानवी शरीराने त्याचा अवयव लगेच नाकारू नये.
असं पहिल्यांदाच झालं आहे की मानवी शरीरा एखाद्या दुसऱ्या प्राण्याच्या किडनीचं यशस्वी ट्रान्सप्लांट करण्यात आलं. याआधीही अनेक प्रकारचे परिक्षण झाले आहेत. पण प्रत्येकवेळी ट्रान्सप्लांट अपयशी ठरत होतं. मात्र, पहिल्यांदाच डुकराची किडनी मानवी शरीराने यशस्वीपणे स्वीकारली.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रान्सप्लांटची ही प्रक्रिया एक ब्रेन डेड झालेल्या रूग्णांवर करण्यात आली. रूग्णांच्या किडनीने काम करणं बंद केलं होतं. पण त्याला लाइफ सपोर्टवरून हटवण्याआधी डॉक्टरांनी त्याच्या परिवाराकडे या टेस्टची परवानगी मागितली होती. त्यानंतर हा प्रयोग करण्यात आला. तीन दिवसांपर्यंत डुकराची किडनी ब्रेन डेड रूग्णाच्या रक्त वाहिन्यांसोबत जुळलेली होती. किडनी शरीराच्या बाहेरच ठेवण्यात आली होती.
अमेरिकेत यूनायटेड नेटवर्क फॉर ऑर्गन शेअरिंगनुसार, सध्या १,०७००० लोक ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या वेटींग लिस्टमध्ये आहेत. यातील ९० हजारांपेक्षा अधिक लोकांना किडनीची गरज आहे. रिपोर्ट सांगतो की, एका किडनी ट्रान्सप्लांटसाठी रूग्णाला सरासरी तीन ते पाच वर्ष वाट बघावी लागते. अशात अमेरिकन डॉक्टरांच्या या यशाला वरदान मानलं जात आहे.