Bird Flu मानवांसाठी ठरू शकतो नवा धोका; WHO कडून गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 04:33 PM2023-02-09T16:33:44+5:302023-02-09T16:39:53+5:30
bird flu : डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे.
नवी दिल्ली : एच5 एन1( H5N1) म्हणजेच बर्ड फ्लू जगासाठी नवीन समस्या बनू शकते. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे. यातून काही प्राण्यांमध्ये प्रकरणेही समोर आली आहेत. अशा स्थितीत प्राण्यांपासून माणसांमध्ये त्याचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
व्हर्च्युअल ब्रीफिंग दरम्यान, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी देशांना सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाचे बारकाईने निरीक्षण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मानवांमध्ये विषाणूचा प्रसार होण्याचा धोका अजूनही कमी आहे, परंतु आम्ही असे गृहीत धरू शकत नाही की ते असेच राहील आणि भविष्यात कोणत्याही बदलांसाठी आपण तयार असले पाहिजे. यूकेमध्ये H5N1 चा उद्रेक झाल्यानंतर डब्ल्यूएचओने हे विधान केले आहे.
दरम्यान, बर्ड फ्लूची प्रकरणे यूकेमध्ये अनेक प्राण्यांमध्ये दिसून येत आहेत. हा विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये वेगाने पसरत आहे. H5N1 पूर्वी माणसांमध्ये आढळून आला आहे, परंतु ही प्रकरणे दुर्मिळ आहेत. मात्र, प्राण्यांमध्ये या फ्लूच्या संसर्गाच्या बातम्यांमुळे चिंता वाढली आहे की, H5N1 च्या स्ट्रेनमध्ये काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे तो मानवांमध्येही पसरण्याचा धोका वाढू शकतो. बर्ड फ्लूवर नियंत्रण मिळवले नाही तर त्याचा प्रसार जगासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला होता.
अमेरिकेत बर्ड फ्लूचा कहर
यावर्षी अमेरिकेला बर्ड फ्लूच्या मोठ्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागला आहे. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात 58 मिलियनहून अधिक पोल्ट्री बाधित झाल्या आहेत. वन्य पक्ष्यांमध्ये 6,100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बर्ड फ्लूचे विविध स्ट्रेन मिळून घातक ठरू शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर हा फ्लू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरला तर तो कोरोना सारखा साथीचा रोग देखील बनू शकतो. दरम्यान, याची शक्यता फार कमी असली तरी डब्ल्यूएचओने एक अलर्ट जारी करत म्हटले आहे की, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्षी आणि प्राण्यांवर कडक नजर ठेवावी. ज्यामुळे त्याचा प्रसार थांबवता येईल. वेळीच योग्य ती पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.