Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लू पुन्हा घालणार थैमान?; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:15 PM2024-04-23T14:15:15+5:302024-04-23T14:19:45+5:30
Bird Flu : बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे.
बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. अंटार्क्टिकमधील पेंग्विनमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर, मानवामध्ये H5N1 व्हायरसची पुष्टी झाल्याबद्दल अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की, याकडे गांभीर्याने आणि सावधगिरीने पाहिले पाहिजे कारण ते महामारीचे रूप धारण करू शकते आणि मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकते. बर्ड फ्लू H5N1 इतका धोकादायक का मानला जातो ते जाणून घेऊया.
बर्ड फ्लूवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी एवियन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूबाबत इशारा दिला आहे. हा व्हायरस अनेक वर्षांपासून साथीच्या यादीत अग्रस्थानी आहे. आता तो धोकादायक बनत चालला आहे. असे झाल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. तसेच जॉन फुल्टन नावाच्या तज्ज्ञाने असं म्हटलं आहे की, तो कोरोनापेक्षा 100 पट जास्त धोकादायक होऊ शकतो. म्यूटेट होऊ शकतो आणि घातक ठरू शकतो.
बर्ड फ्लूची प्रकरणं फक्त टेक्सासमध्येच नाही तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आढळून आली आहेत. हा व्हायरस गायींमध्येही पसरला आहे. अमेरिकेत मानवांमध्ये एव्हीयन फ्लूची ही दुसरी घटना आहे. कोलोरॅडोमध्ये 2022 मध्ये पहिली केस आढळली होती. 1 जानेवारी 2003 ते 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत जगातील 23 देशांमध्ये मानवांमध्ये बर्ड फ्लूचे 887 रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, यापैकी 462 प्रकरणे अतिशय धोकादायक आहेत. बर्ड फ्लूचा व्हायरस पहिल्यांदा 1959 मध्ये समोर आला होता. 2020 नंतर, तो अनेक देशांमध्ये प्राण्यांमध्ये पसरला आहे.
बर्ड फ्लूची लक्षणं
- इतर कोणत्याही फ्लूप्रमाणे बर्ड फ्लूची लक्षणे आहेत.
- खोकला येणे.
- ताप येणे.
- अंगदुखी
- गंभीर किंवा जीवघेणा न्यूमोनिया होण्याचा धोका.
आरोग्यासंबंधीत कोणतीही समस्या असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.