Blood : कुठेच रक्त मिळत नाहीये ? - आता चिंता सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:47 AM2022-11-15T11:47:47+5:302022-11-15T11:48:13+5:30

Blood: विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक दुर्धर आजारांवर पूर्वी मृत्यू हाच एक पर्याय होता; पण आता अनेक असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले आहेत आणि असे लोकही सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

Blood: Blood is not getting anywhere? - Stop worrying now! | Blood : कुठेच रक्त मिळत नाहीये ? - आता चिंता सोडा!

Blood : कुठेच रक्त मिळत नाहीये ? - आता चिंता सोडा!

googlenewsNext

विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक दुर्धर आजारांवर पूर्वी मृत्यू हाच एक पर्याय होता; पण आता अनेक असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले आहेत आणि असे लोकही सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. तरीही आजही अनेक लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी मृत्यूची वाट पाहत जगत राहणं आणि एक दिवस या जगातून निघून जाणं, एवढाच पर्याय शिल्लक आहे. आरोग्य विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना आणि जवळपास प्रत्येक आजारावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध असताना असं का व्हावं? - याचं कारण आहे रक्ताची कमतरता. अनेक आजारांतील रुग्णांना उपचार तर उपलब्ध आहेत; पण त्यांना गरजेच्या वेळी रक्तच मिळत नाही, ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. 
यासंदर्भातील जागतिक आकडेवारी बघितली तरी रक्तदानासंदर्भात आपण किती उदासीन आहोत, हे लक्षात येतं. त्यातल्या त्यात श्रीमंत देशांमध्ये तरी परिस्थिती बरी आहे; पण गरीब आणि विकसनशील देशांमध्ये याबाबत काही जाणीव जागृतीच नाही, अशी परिस्थिती आहे. श्रीमंत आणि उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रक्तदानाचं प्रमाण आहे दरहजारी ३१.५, उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण आहे १६.४, कमी मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये ६.६ तर गरीब, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रक्तदानाचं प्रमाण आहे दरहजारी फक्त पाच ! 
जगातल्या कुठल्याही देशात जा, तिथे रक्ताची टंचाईच आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो तो वेळेवर आणि हव्या त्या गटाचे रक्त न मिळाल्यामुळेच. यासाठीच कृत्रिम रक्त तयार करण्याचे प्रयत्न संशोधक कित्येक वर्षांपासून करताहेत; पण त्यांना अजून तरी त्यात म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. नैसर्गिक रक्ताला कोणताही पर्याय सापडत नसताना चिंतेत पडलेल्या संशोधकांना आता आशेचा एक नवा किरण गवसला आहे. 
प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेलं रक्त पहिल्यांदाच स्वयंसेवकांना चढवण्यात आल्याचं आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. केम्ब्रीज आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांच्या नामांकित संशोधकांनी या संशोधनात आपला सहभाग दिला. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर मानवजातीला अक्षरश: वरदान मिळेल. आरोग्य विज्ञानामुळे आधीच मानवाच्या आयुष्यात बरीच वाढ झाली आहे, हा प्रयोग सफल झाल्यास मानवाला सुदृढ आयुष्याचीही देणगी मिळेल. एवढंच नाही, ज्यांचा रक्तगटच अतिशय दुर्मीळ आहे, त्यांना वाचवण्यासाठी तर हा मार्ग सर्वोत्तम आणि जणूकाही शेवटचा असेल. कारण आपल्याला माहीत आहेत ते फक्त ठराविक रक्तगट. उदाहरणार्थ ए, बी, एबी, ओ.. आदी. मात्र त्या व्यतिरिक्तही असे अनेक रक्तगट आहेत, जे सर्वसामान्यांना माहीतच नाहीत. 
ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे प्रो. ॲशले म्हणतात, काही रक्तगट तर इतके दुर्मीळ आहेत की, त्या रक्तगटाचे संपूर्ण जगभरात एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक आहेत. अशा लोकांना काही झालं तर काय करायचं? त्यांच्यासाठी तर ‘वाट पाहण्याचाही’ पर्याय उपलब्ध नाही. उदाहरणार्थ एका रक्तगटाचं नाव आहे, ‘बॉम्बे’! या रक्तगटाचा व्यक्ती सर्वप्रथम भारतातच सापडला होता. संपूर्ण ब्रिटनमध्ये या रक्तगटाचे केवळ तीन युनिट्स उपलब्ध आहेत! 
अर्थात आत्ता प्रयोगशाळेत जे रक्त तयार करण्यात आलं आहे, ते अजून संपूर्णपणे रुग्णाला देता येऊ शकत नाही. कारण त्यावरच्या काही चाचण्या बाकी आहेत. मात्र, नैसर्गिक रक्तात हे कृत्रिम रक्त थोड्या प्रमाणात मिसळून त्याचे काही दुष्परिणाम होतात का, हे सध्या तपासलं जात आहे. हे रक्त मिसळण्याचं प्रमाण सध्या तरी एक-दोन चमचे एवढंच मर्यादित आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या रक्तात लाल रक्तकोशिकांवर भर देण्यात आला आहे. या कोशिका फुप्फुसातून ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीरभर तो पसरवतात. या पद्धतीत सर्वसामान्य व्यक्तीचं रक्त घेऊन त्यात कृत्रिम रक्त मिसळून ते इतर रुग्णांना दिलं जाऊ शकतं. या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे पाच लाख स्टेम सेल्समधून तब्बल ५० कोटी लाल रक्तपेशी तयार होऊ शकतात.

कृत्रिम रक्त अधिक दमदार ! 
संशोधकांचं म्हणणं आहे, सामान्यपणे लाल रक्तपेशी जास्तीत जास्त १२० दिवसांपर्यंत टिकतात. त्यानंतर त्यांची जागा नव्या पेशी घेतात. जेव्हा कोणाचंही रक्त रुग्णाला दिलं जातं, तेव्हा त्यात नव्या आणि जुन्या रक्तपेशींचं मिश्रण असतं. कृत्रिम रक्तातील पेशी मात्र संपूर्णत: नव्या असल्यानं त्या पूर्ण १२० दिवस टिकतील, त्यामुळे रुग्णांना जास्त रक्ताची गरज पडणार नाही; पण यामुळे रक्तदानाचं प्रमाण आणखी कमी होईल, अशीही साधार भीती संशोधकांना वाटते.

Web Title: Blood: Blood is not getting anywhere? - Stop worrying now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.