मुलांचं जेवण थंड करण्यासाठी त्यावर फुंकर घालताय?; मग हे वाचाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:05 PM2019-05-08T13:05:41+5:302019-05-08T13:09:39+5:30
नवजात बालकांची काळजी घेणं आणि त्यांच पालनपोषण करून त्यांना मोठं करणं काही सोपं काम नसतं. ही आई-वडिलांच्या कसोटीची वेळ असते, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.
(Image Credit : Antpress.info)
नवजात बालकांची काळजी घेणं आणि त्यांच पालनपोषण करून त्यांना मोठं करणं काही सोपं काम नसतं. ही आई-वडिलांच्या कसोटीची वेळ असते, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यामध्ये दोघांचाही वेळ, धैर्य आणि सहनशक्ती पणाला लागते. बाळाला नाहूमाखू घालणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना शिकवणं यांसारख्या गोष्टींमध्ये आई-वडिल कोणतीच कसर ठेवत नाहीत. पण अनेकदा त्यांच्या काळजीपोटी केलेल्या गोष्टीच त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. एवढचं नाही तर आपण त्या गोष्टी अगदी सहज करून जातो. अशीच एक सवय म्हणजे, मुलांना भरवताना जेवणं थंड करण्यासाठी त्यावर आपल्या तोंडाने फुंकर घालणं. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही फार मोठी चूक करत आहात. कारण तुमच्या याच सवयीचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात.
बॅक्टेरिया पसरण्याचा धोका
दातांसाठी घातक ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या वक्तीकडे संसर्ग होऊ शकतो. अशातच जर तुमच्या दातांमध्ये कॅविटी आहे आणि तुम्ही मुलांना भरवताना त्यावर फूंकर घातली तर या गोष्टीचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. असं केल्याने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया मुलांच्या खाण्यामध्ये जातात आणि त्यामार्फत ते मुलांच्या तोंडामध्ये पोहोचतात.
(Image Credit : Reader's Digest)
दात येण्याआधीच कॅविटी होण्याची भीती
मुलांच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया गेल्याने त्यांच्या तोंडामध्ये प्लाक तयार होतं आणि मुलांना दात येण्याआधीच त्यांच्या तोंडामध्ये कॅविटी तयार होतात. दात आल्यानंतर 5 ते 6 महिन्यांमध्येच मुलांचे दात किडण्यास सुरुवात होते.
या गोष्टींची घ्या काळजी :
असे बॅक्टेरिया साधारणतः मुलांच्या खाण्यावर फुंकर घातल्याने, एकाच चमच्याने जेवल्याने पालकांच्या सलाइवा मधून मुलांच्या तोंडात पोहोचतात. त्यामुळे शक्यतो असं करणं टाळा आणि पुढिल गोष्टींची काळजी घ्या...
- मुलांचं जेवण थंड करण्यासाठी तोंडाने फुंकर मारू नका.
- तुम्ही ज्या चमच्याने जेवत असाल, किंवा ज्या ग्लासातून पाणी पित असाल त्याचा वापर मुलांसाठी करू नका.
- आपल्या मुलांच्या डेंटल हाइजीनकडे लक्ष द्या.
- थोड्या थोड्या वेळात मुलांचं तोडं स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. जेणेकरून जास्त बॅक्टेरिया तयार होणार नाहीत.
- प्रत्येक वेळी जेवल्याने दूध प्यायल्यानंतर मुलांची जीभ, दात आणि गाल व्यवस्थित स्वच्छ करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.