ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:28 PM2021-12-06T18:28:55+5:302021-12-06T18:31:51+5:30
२९ देशांमध्ये सुमारे ३७३ प्रकरणे ओमिक्रॉन प्रकाराने प्रभावित झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता लोकांना खरंच बूस्टर डोसची गरज आहे का? जेणेकरून संसर्ग टाळता येईल.
अलीकडेच ओमायक्रॉन व्हेरिएंट भारतातही आढळून आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, दोन्ही प्रकरणे कर्नाटकातच आढळून आली आहेत. ते म्हणाले की, कोविड-19 च्या या स्थितीकडे आरोग्य मंत्रालयाला लक्ष द्यावे लागेल. २९ देशांमध्ये सुमारे ३७३ प्रकरणे ओमिक्रॉन प्रकाराने प्रभावित झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता लोकांना खरंच बूस्टर डोसची गरज आहे का? जेणेकरून संसर्ग टाळता येईल.
कोविड-19 येऊन २ वर्षे उलटून गेल्यानंतर आता संपूर्ण जगाने कोविडसोबत जगणं शिकून घेतलं होतं. तोच या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आमची लस ओमायक्रॉनवर तितकीशी प्रभावी नाहीये. तज्ञांनीच असं म्हटल्यामुळे आता असा प्रश्न समोर येत आहे की लसीकरण करूनही लोकांना खरंच बुस्टर डोसची गरज आहे का?
शरीराची इम्युन सिस्टम समजून घेतली पाहिजे
मुंबईतील व्होरा क्लिनिकचे चेस्ट फिजिशियन प्रोफेसर डॉक्टर आगम व्होरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू अजूनही आपल्यामध्ये आहे. लोक कामावर जात आहेत आणि शाळाही सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण पूर्ण झाल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीची चाचणी करण्यासाठी अँटीबॉडी चाचणीवर चर्चा केली पाहिजे. कारण यामुळे बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का हे शोधण्यात मदत होईल. ही लस विषाणू रोखण्यासाठी प्रभावी आहे परंतु १००% नाही. अशा परिस्थितीत अँटीबॉडी चाचणी करून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती समजून घेऊन बूस्टर डोस देण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
अँटीबॉडी लेव्हल कमी झाल्याने काय धोका असतो?
मेदांताच्या मेडिसिन विभागाच्या वरिष्ठ संचालक डॉक्टर सुशीला कटारिया यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, लसीचा प्रभाव कमी दिसल्यानंतर बूस्टर डोस देणे किंवा अतिरिक्त लसीचा डोस देण्याची संकल्पना पुढे आली आहे. पण हे दर्शवणारा असा कोणताही पुरावा नाही की प्रोटिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहे. दरम्यान, लोकांना व्हायरसची लागण होण्याचा धोका वाढत आहे त्यामुळे अनेक देशांनी बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.
कोणाला आहे बुस्टर डोसची जास्त गरज?
काही लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत असते. अशा लोकांना अतिरिक्त डोसची आवश्यकता असते. घातक रोग असलेले रुग्ण जे रेडिओथेरपी किंवा केमोथेरपीवर आहेत, जे सतत स्टिरॉइड्स घेतात, जे लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, मधुमेहाचे रुग्ण, दीर्घकालीन किडनी रोगाचे रुग्ण, लिव्हर रोगाचे रुग्ण, नुकतेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेले लोक. वरील सर्व लोकांना बूस्टर डोसची अधिक आवश्यक आहे.
कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज आहे का?
कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार आठवडाभरापूर्वीच आला आहे. पण पूर्वीपेक्षा याचा संसर्ग जास्त वेगाने पसरत आहे. जेव्हा जेव्हा करोनाचा नवीन स्ट्रेन येतो तेव्हा त्याबद्दल रिसर्च करण्यासाठी किमान १ महिना लागतो. अशा परिस्थितीत आपल्याकडे सध्या त्याबद्दल फारसा डेटा नाही. तज्ञ मंडळीचा रिसर्च अहोरात्र चालूच आहे. आता संशोधना नंतरच हे समजू शकते की या म्युटेंटवर वॅक्सिनच्या रोगप्रतिकारक शक्तीचा परिणाम होईल की नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती यावर मात करायला पुरेशी आहे.
सावधान राहा पण स्ट्रेस घेऊ नका
कोरोना व्हायरसच्या या नवीन स्ट्रेन किंवा नवीन प्रकाराबद्दल आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पण त्याबद्दल फार काळजी करणेही चांगले नाही. कोविड-19च्या या नवीन प्रकाराला घाबरून जाण्याऐवजी योग्य सवयी अंगीकारल्या पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस योग्य वेळी मिळाले तर आपण या आजाराशी सहजपणे लढू शकतो. यासोबतच मास्क घालणे आणि स्वच्छतेची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे.