ब्रेन ट्रेनिंग अॅप 'डिकोडर' लॉन्च; एकाग्रता वाढविण्यासाठी करतं मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:20 PM2019-01-23T13:20:38+5:302019-01-23T13:21:50+5:30
केम्ब्रिज विश्वविद्यालयातील संशोधकांनी एक खास ब्रेन ट्रेनिंग अॅप तयार केलं आहे. जे दैनंदिन जीवनामध्ये लोकांना होणारी एकाग्रतेसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.
केम्ब्रिज विश्वविद्यालयातील संशोधकांनी एक खास ब्रेन ट्रेनिंग अॅप तयार केलं आहे. जे दैनंदिन जीवनामध्ये लोकांना होणारी एकाग्रतेसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. संशोधकांच्या टिमने या ब्रेन ट्रेनिंग अॅपला 'डिकोडर' असं नाव दिलं आहे. आयपॅडवर या अॅपचं एक महिन्यापर्यंत दररोज आठ तास परिक्षण करण्यात आलं असून त्यानंतर एकाग्रतेमध्ये झालेल्या सुधारणांची नोंद करण्यात आली.
केम्ब्रिज विश्वविद्यालयातील बिहेविरल आणि क्लिनिकल न्यूरोसायन्सच्या संशोधकांचं असं मत आहे की, या अॅपचा वापर केल्याने लोकांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक आरोग्य विभागाचे प्रोफेसर बारबरा यांनी सांगितले की, 'जेव्हा आपण ऑफिसमधून घरी परततो, तेव्हा आपल्याला जाणवतं की आपला दिवस फार धावपळीमध्ये गेला आहे. परंतु, आपल्याला हे लक्षात राहत नाही की, आपण पूर्ण दिवस नक्की काय काय केलं.'
बिहेविरल न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या शोधपत्रामध्ये त्यांनी सांगितले की, दिवसभरात अनेक कामं आपण करतो. त्यातील काही कामं सोपी तर काही तुलनेने अवघड असतात. त्याचप्रमाणे काही कामं अवघड असण्यासोबतच अत्यंत महत्त्वाची असतात. अशी कामं करताना आपल्याला एकाग्रतेची गरज असते.
संशोधनादरम्यान, संशोधकांनी 75 लोकांचे तीन गट केले. ज्यामधील एका गटाला 'डिकोडर' अॅप देण्यात आलं, तर दुसऱ्या गटाला बिंगो गेम खेळण्यासाठी देण्यात आला आणि तिसऱ्या गटाला कोणताही गेम देण्यात आला नाही. सर्व लोकांना सलग चार आठवड्यांपर्यंत अॅप आणि गेम खेळण्यासाठी सांगितले. त्यानंतर सर्व निष्कर्षांची नोंद करण्यात आली.
संशोधकांनी केलेल्या निष्कर्षातून असं समजलं की, ज्यांनी डिकोडर अॅपचा वापर केला त्यांना बिंगो खेळणाऱ्या किंवा गेम न खेळणाऱ्यांच्या तुलनेमध्ये फायदा झाला. संशोधकांच्या टिमने सांगितले की, निष्कर्षामध्ये फक्त काही गोष्टींचेचं अंतर होते आणि त्यांचा प्रभाव मेथाफेनिडेटी किंवा निकोटीन यांसारख्या स्टिमुलसचा वापर करण्याएवढाच प्रभावी होता.