Brain Tumor: मोबाईल फोनचा वापर केल्याने ब्रेन ट्युमर होत नाही; वैज्ञानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:28 AM2022-03-30T10:28:52+5:302022-03-30T10:31:42+5:30
जगात फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे शरीरावर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या शास्त्रज्ञांनी व्यापक संशोधन केले.
मोबाईल फोनचा अती वापर केल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात, असे सर्वच म्हणतात. त्यातून निघणारे रेडिएशन, किरणे आदी डोळ्यांचे, मेंदूचे विकार वाढवितात असे अनेक संशोधनांतून दिसून आले आहे. रेडिएशनने तर मेंदूवर परिणाम होतो, असेही म्हटले जाते. परंतू आता त्याच्या उलटच दावा करण्यात आला आहे.
मोबाईलचा वापर केल्याने ब्रेन ट्युमरचा धोका उत्पन्न होत नाही, असे एका संशोधनात दिसून आले आहे. 'इंडिपेंडेंट'मध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार हा शोध 7,76,000 हून अधिक महिलांवर घेण्यात आला आहे. या महिलांनी गेल्या दोन दशकांपासून सतत मोबाईल वापरला होता. त्यांना ट्युमर होण्याचा कोणताही धोका दिसला नाही.
जगात फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे शरीरावर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या शास्त्रज्ञांनी व्यापक संशोधन केले. ज्यांनी मोबाईल वापरला नाही, त्यांच्या तुलनेत मोबाईल वापरणाऱ्यांना ब्रेन ट्युमरचा धोका कमीच असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासात, 1935 ते 1950 दरम्यान जन्मलेल्या यूकेमधील चारपैकी एका महिलेवर संशोधन करण्यात आले.
या अभ्यासात, 2001 मध्ये, सुमारे 7,76,000 सहभागींनी मोबाईल फोन वापराविषयी प्रश्नांची उत्तरे दिली. यापैकी जवळपास निम्म्या महिलांचे 2011 मध्ये पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. संशोधनात असे समोर आले आहे की 2011 पर्यंत 60 ते 64 वयोगटातील सुमारे 75 टक्के महिलांनी मोबाईल फोन वापरला होता. तर 75 ते 79 वर्षे वयोगटातील 50 टक्क्यांहून कमी महिलांनी मोबाइल फोन वापरला होता.