स्तनांचा कर्करोग आणि उशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 10:02 AM2018-04-10T10:02:54+5:302018-04-10T10:02:54+5:30

ग्रामीण भागातील स्त्रिया आणि स्तनांचा कर्करोग या विषयावर स्वीडन येथील ‘उमिआ’ विद्यापीठात पीएच.डी.साठी मी संशोधन केलं. अभ्यासात समोर आलं एक वास्तव! ज्यामुळे आजार बळावतो, निदान आणि उपचारांत विलंब होतो.

Breast cancer and delay | स्तनांचा कर्करोग आणि उशीर

स्तनांचा कर्करोग आणि उशीर

- डॉ. नितीन गंगणे

सेवाग्राम येथील ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थेत मी काम करतो. इथे आलेल्या रुग्णांची माहिती संकलित होत असते. त्या माहितीचा अभ्यास केला जातो. अशाच एका अभ्यासात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगासंदर्भात एक निरीक्षण समोर आलं. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया हा आजार हाताबाहेर गेल्यावरच दवाखान्यात पोहचतात. औषधोपचारासाठी एवढा उशीर का होतो या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं वाटू लागलं. त्याच दरम्यान स्वीडन येथील ‘उमिआ’ विद्यापीठाकडून करण्यात आलेलं सार्वजनिक आरोग्यसेवा या विषयातल्या पीएच.डी.चं आवाहन माझ्या वाचण्यात आलं. मग मी ‘ग्रामीण भागातील स्त्रिया आणि स्तनांचा कर्करोग’ याच विषयावर पीएच.डी.साठी संशोधन सुरू केलं. हा अभ्यास प्रामुख्यानं तीन पातळ्यांवर करण्यात आला.
१) स्तनांच्या कर्करोगाचे एकूण रुग्ण, त्यांना या आजाराविषयी असलेली माहिती, त्यांचा या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन.
२) या आजारात होणारा विलंब. तोही दोन प्रकारचा. एका प्रकारात रुग्णाकडून होणारा विलंब आणि दुसऱ्या प्रकारात व्यवस्थेकडून होणारा विलंब. निदान आणि उपचार यासंदर्भातला विलंब.
३) रुग्णाच्या जगण्याची गुणवत्ता. आजाराआधी आणि आजारानंतर.
या तीन पातळ्यांवर अभ्यास करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या वयोगटातील एक हजार स्त्रियांचा अभ्यास केला. यात ७० टक्के महिला ग्रामीण भागातल्या आणि ३० टक्के महिला शहरी भागातल्या होत्या. हा अभ्यास करताना मी अनेक स्त्रियांशी बोलत होतो. तेव्हा लक्षात आलं की, मला अभ्यासादरम्यान भेटलेल्या एकतृतीयांश स्त्रियांना तर स्तनांचा कर्करोग काय असतो हेच माहीत नव्हतं. ९० टक्के महिलांना तर स्तनांचं स्वपरीक्षण काय असतं, ते कसं करायचं हेसुद्धा माहीत नव्हतं. आपल्या स्तनात काही बदल दिसतोय हे समजून स्वत:हून दवाखान्यात येणं हेही त्यामुळे त्यांना माहिती नव्हतंच. काही स्त्रियांना हे कळत होतं की आपल्या स्तनात काहीतरी गाठीसारखं विचित्र लागतंय; पण केवळ ती गाठ दुखत नाही, काही त्रास होत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. उपचार घेण्याचा तर मग प्रश्नच नव्हता. स्तनांच्या कर्करोगात निदान आणि उपचारांत विलंब होणं फार धोक्याचं असतं. तीन महिन्यांपेक्षा जास्त
उशीर झालेला नसेल तर रुग्णांची वाचण्याची शक्यता वाढते; मात्र तो झाला तर उपचाराचा कालावधी, खर्च वाढतो आणि उपचाराचा स्तरही वाढतो.

या अभ्यासात असंही लक्षात आलं की, वयस्कर स्त्रियांकडे घरातल्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेही आजार बळावतो. ज्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या कुटुंबावर अवलंबून होत्या, त्यांच्याही आजाराची दखल वेळीच घेतली नाही.
एवढंही करून ज्या स्त्रिया स्थानिक पातळीवर दवाखान्यात जातात त्यांचंही लवकर योग्य निदान होताना दिसत नाही. कारण गाव-पातळीवर कर्करोगाशी संबंधित स्क्रीनिंग करणाऱ्या यंत्रणा, बायप्सीचं तंत्र उपलब्ध नसतं. त्यामुळे निदानाच्या टप्प्यावर उशीर होताना दिसतो.
या अभ्यासासाठी मी स्तनांचा कर्करोग झालेल्या एकूण २१२ महिलांचा अभ्यास केला, तेव्हा उपचाराच्या पातळीवरचा विलंब झालेला स्पष्ट आढळून आला. ज्या स्त्रिया आमच्या सेंटरपर्यंत पोहचल्या त्यांचं निदान झाल्यावर उपचारादरम्यान २३ टक्के स्त्रियांनी उपचाराकडे दुर्लक्ष केलं.
हे दुर्लक्ष आणि विलंब का होतो याचीही काही कारणं आहेत. एकतर उपचार करणं म्हणजे रुग्णालयात दाखल होणं आलं. जिथे कुटुंबाचं हातावर पोट तिथे रोजगार बुडेल या काळजीनं उपचार घेण्यात स्त्रिया टाळाटाळ करताना दिसतात.
मात्र त्यामुळे त्यांचा स्तनाचा कर्करोग आणखी गंभीर टप्प्यावर गेलेला आढळला.
माहितीचा अभाव हे आणखी एक मोठं कारण. स्तनांचा कर्करोग म्हणजे काय हेच ग्रामीण भागात अजूनही अनेक महिलांना माहिती नाही, हेही या अभ्यासात दिसून आलं.
ग्रामीण भागातील ही परिस्थिती बदलायची तर काय करायला हवं याचे काही पर्यायही या अभ्यासाअंती मला दिसता आहेत.
ग्रामीण भागातल्या स्त्रियांना या आजाराची माहिती देणं, स्तनांचं स्वपरीक्षण कसं करायचं हे शिकवणं, उपचारासाठी योग्य सल्ला देणं, मुख्य म्हणजे योग्य माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. आशा वर्कर हे काम गावोगावी करू शकतात. त्यामुळे निदान, उपचार यातला विलंब कमी होईल.
योग्यवेळी उपचारांना सुरुवात होईल. माहितीचा, प्रचार-प्रसार, ग्रामीण महिलांमध्ये स्वआरोग्याचं भान हे सारं यासाठी फार गरजेचं आहे असं वाटतं.


( लेखक महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम येथे प्राध्यापक आहेत.)
शब्दांकन - माधुरी पेठकर

Web Title: Breast cancer and delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.