ब्रेस्ट कॅन्सरचा वाढता धोका! भीती वाटते? पण घाबरू नका कारण...; फोर्टिसच्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:34 PM2021-10-07T13:34:44+5:302021-10-07T13:38:13+5:30
Breast cancer Symptoms, causes : ब्रेस्ट कॅन्सर हा आता सर्वात कॉमन कॅन्सर झाला आहे. कॅन्सर म्हटल्यावर थोडी भीती वाटते पण आता यामध्ये नवीन उपचार आल्याने घाबरण्याची गरज नाही.
कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार आहे. वेळेत उपचार केल्यास हा लवकर बरा होऊ शकतो. तर काही वेळा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. कॅन्सरच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कॅन्सर नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. तंबाखू किंवा सिगारेट यासोबतच जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत आहेत. कॅन्सर झाला म्हणजे आता सर्व संपलं असं अनेकांना वाटतं पण असं नाही. लोकमतने वाचकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन यावर फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला आहे. कॅन्सर आणि त्यावरील नवनवीन उपचार पद्धतीबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. अनिल हेरूर (Head of Department & Senior Consultant - Surgical Oncology), डॉ. हितेश सिंघवी (Consultant - Surgical Oncology, Head & Neck Cancer), डॉ. निखिल धर्माधिकारी (Consultant - Surgical Oncology ), डॉ. राहुलकुमार चव्हाण (Consultant -Surgical Oncology) यांनी कोरोना आधी कॅन्सवर असलेले उपाय आणि आता झालेले बदल. तसेच प्रमुख लक्षणं कोणती, कॅन्सरबद्दल भीती काढून टाकण्यासाठी खास टिप्स, कशी काळजी घ्यावी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. कॅन्सरच्या किती स्टेज असतात, त्यात कसे उपचार केले जातात हे जाणून घेऊया...
कॅन्सरच्या स्टेज आणि उपचार
कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नाही तर कॅन्सर विरोधात लढावं लागणार आहे. आजकाल उपचार पद्धती खूप विकसित झाली आहे. उदारणार्थ रोबोटिक सर्जरी आली आहे. कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये सर्जरी करता येते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये किमोथेरपी देतो जेणेकरून आजार थोडा कमी झाला पाहिजे. त्यानंतर ऑपरेशन करतो, गरज भासल्यास पुन्हा किमोथेरपी दिली जाते. चौथ्या स्टेजमध्ये हा आजार पसरलेला असतो त्यामुळे त्यांना सर्जरीची गरज नसते कारण त्याचा काहीच फायदा होत नाही अशा वेळी फक्त किमोथेरपी दिली जाते काही रुग्णांमध्ये रक्तस्त्राव होतो किंवा त्रास असेल तर त्याचं ऑपरेशन केलं जातं.
ब्रेस्ट कॅन्सरचा मोठा धोका
ब्रेस्ट कॅन्सर हा आता सर्वात कॉमन कॅन्सर झाला आहे. कॅन्सर म्हटल्यावर थोडी भीती वाटते पण आता यामध्ये नवीन उपचार आल्याने घाबरण्याची गरज नाही. विकसित तंत्रज्ञान आणि नवीन उपचार पद्धती यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमुख लक्षण म्हणजे ब्रेस्टमध्ये गाठ होणं किंवा काखेत गाठ होणं. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर ब्रेस्ट काढून टाकावं लागणार असंच अनेक महिलांना वाटतं पण आता आपल्याकडे विकसित नवीन उपचार पद्धती आल्या आहेत ज्यामुळे 80 ते 90 टक्के रुग्णांमध्ये ब्रेस्ट काढायची गरज नाही. Oncoplasty सर्जरी आली आहे ज्यामध्ये फक्त ब्रेस्ट मध्ये जी गाठ आहे ती काढली जाते आणि काखेतल्या गाठीही काढता येतात त्यामुळे पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज पडत नाही पण यानंतर रेडिएशन घ्यावं लागतं.