'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधीही वांग्यांला पाहून तोंड वाकडं करणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:24 AM2019-02-18T10:24:51+5:302019-02-18T10:27:04+5:30
वाढतं वजन ही आजच्या लाइफस्टाइलमधील सर्वात जास्त भेडसावली जाणारी समस्या आहे.
वाढतं वजन ही आजच्या लाइफस्टाइलमधील सर्वात जास्त भेडसावली जाणारी समस्या आहे. मग सुरू होतो वजन कमी करण्याचा संघर्ष. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. यात एक्सरसाइज आणि डाएट या दोन गोष्टी प्रामुख्याने केल्या जातात. खासकरून डाएट फार जास्त केलं जातं. अनेकजण वेगवेगळ्या भाज्या खाणं, वेगवेगळे पदार्थ खाणं बंद करतात. पण याचा प्रत्येकालाच फायदा होतो असे नाही.
घरात वांग्यांची भाजी झाली आहे म्हटल्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांची भूक अचानक गायब होते. कुणी बाहेर जाऊन काही खाऊन येतं, तर कुणी वेगळं काही खातात. वांगी म्हटलं की, अनेकजण नाक मुरडतात. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर वांगी खाणं फायदेशीर ठरू शकतं. वांग्यांमध्ये वजन कमी करण्याचे किंवा नियंत्रणात ठेवण्याचे गुण असतात.
१०० ग्रॅम वांग्यांमध्ये २५ कॅलरी असतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा कोणताही पदार्थ खाणं फायदेशीर ठरेल. बरं वांग्याने केवळ वजन कमी करण्यास फायदा मिळेल असे नाही, तर याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत.
वजन कमी करा
१०० ग्रॅम वांग्यांमध्ये केवळ २५ कॅलरी असतात. तसेच वांग्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि तुमचं मधेमधे काहीही खाणं बंद होऊ तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल कमी करा
वांग्यांमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाणही अधिक असतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं शरीरातील प्रमाण वाढत नाही. जेव्हा तुम्ही वांगी खाता तेव्हा तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचाही धोका कमी राहतो.
अन्न चांगलं पचतं
वांग्यांमध्ये डायट्री फायबरचं प्रमाण अधिक आढळतं. त्यामुळे फायबर आतड्यांनी चिकटलेल्या वेगवेगळ्या वाईट गोष्टींना स्वच्छ करतं. याने अन्न चांगल्याप्रकारे पचन होण्यास फायदा होतो. पचन व्यवस्थित झालं तर पोटाची कोणतीही समस्या तुम्हाला होणार नाही.
हाडे होतात मजबूत
वांगी खाल्ल्याने तुमच्या हाडांसाठीही फायदेशीर असतात. कारण यात आयर्न आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यासोबतच वांग्यांमध्ये असलेलं फिनॉलिक अॅसिड हाडांची झीज कमी करून हाडे मजबूत करतं.