जपानमधील आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांना मिळतो व्यायामाचा ब्रेक.
By admin | Published: June 21, 2017 06:52 PM2017-06-21T18:52:31+5:302017-06-21T18:52:31+5:30
जगभरातल्या अनेकांची व्यायामाला वेळच नाही अशी तक्रार असते. अशा तक्रारीवर जपाननं मात्र एकदम सही उत्तर शोधून काढलय.
- सारिका पूरकर-गुजराथी
भारत ही येत्या काळात मधुमेहाची राजधानी बनते की काय असं वाटावं इतकं मधुमेही रूग्णांच प्रमाण भारतात आहे. लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. पंचविशी-तिशीतील तरुणांचा मृत्यू हृदयाविकारानं होताना दिसतोय. बदलती जीवनशैली आपल्या मुळावर उठलीय की काय? असा प्रश्न पडावा असं वातावरण सध्या आजूबाजूला आहे. बदलत्या जीवनशैलीतला महत्त्वाचा घटक म्हणजे बैठं काम. दिवसातले १२ ते १४ तास एका जागेवर बसून बहुतांश नोकरदार आणि व्यावसायिक काम करत असतात. याबाबतीत आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की धूम्रपानाइतकाच धोका या ‘बैठक’ संस्कृतीमुळे निर्माण होऊ पाहतोय. साहजिकच याचेच विपरित परिणाम दिसू लागलेय.
पचनसंस्थेचं काम बिघडणं, हायपर अॅसिडिटी, संधीवात ही दुखणी देखील कमी वयातच मानगुटीवर बसू लागली आहेत. युवाशक्ती ही कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती असते आणि तिच जर अशी अकाली आणि गंभीर आजारांच्या विळख्यात सापडत असेल तर हे असं नुसतंच पाहात बसायचं का? यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा. सकाळी लवकर उठून व्यायाम करणं शक्य होत नाही. १४ ते १६ तास काम केल्यानंतर रात्री शतपावलीही करायलाही ऊर्जा शिल्लक राहात नाही.
२०१४ मध्ये जपानमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात असं निरीक्षण नोंदवलं गेलं की जपानमधील कामगार हे केवळ ६ तास २२ मिनिटंच झोपतात. अन्य देशांमधील कामगारांपेक्षा जपानमधील कामगारांच्या झोपेचे तास हे खूपच कमी होते. आणि म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी पुरेशा झोपेचं महत्व जाणूनच जपानमध्ये आता कामाच्या ठिकाणी स्लिपिंग ब्रेकही दिला जातो. काम आणि व्यायाम हे दोन्ही एकाच ठिकाणी होऊ शकतं हे जपाननं दाखवून दिलं आहे.