पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर का असते फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:11 PM2022-08-29T17:11:23+5:302022-08-29T17:20:49+5:30
पांढऱ्या साखरेपेक्षा (White Sugar), ब्राउन शुगरचा (Brown Sugar) वापर केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. आहारतज्ज्ञ व डॉक्टरही ब्राउन शुगर, ब्राउन राइस खाण्याचा सल्ला देतात. सर्वसाधारण साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर उपयुक्त ठरू शकते.
निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. आहारात भाजीपाला, डाळी, फळं, भात आदी घटकांचा समावेश असणं गरजेचं असतं. दुसरीकडे दररोज चहा, कॉफी किंवा मिठाईच्या माध्यमातून आपण साखरेचं सेवन करत असतो. गोड जास्त प्रमाणात खाणं म्हणजे स्थूलत्व (Obesity), हृदयरोग (Heart Disease), टाइप-2 डायबेटीस (Diabetes), यकृताशी संबंधित आजार (Lever Disease) आदी आजारांना निमंत्रण देण्यासारख आहे. गोड पदार्थ आवडणाऱ्या व्यक्ती अनेकदा यावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. त्यामुळे पांढऱ्या साखरेपेक्षा (White Sugar), ब्राउन शुगरचा (Brown Sugar) वापर केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. आहारतज्ज्ञ व डॉक्टरही ब्राउन शुगर, ब्राउन राइस खाण्याचा सल्ला देतात. सर्वसाधारण साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर उपयुक्त ठरू शकते.
ब्राउन शुगरमध्ये आहेत पोषक घटक
ब्राउन शुगरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. आरोग्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यात फॅट्स (Fat), कोलेस्टेरॉल, प्रोटीन असत नाही. परंतु, ब्राउन शुगरचे सेवन केल्यास अनेक प्रकारची खनिजं (Minerals) मिळत असतात. यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, कार्बोहायड्रेट्स हे घटक असतात. कॅलरीज कमी प्रमाणात असतात.
ब्राउन शुगरचे फायदे अनेक
'हेल्दीफाय मी डॉट कॉम'वरच्या संदर्भानुसार, सर्वसाधारण साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरचे अनेक फायदे सांगितले आहेत. यात कॅलरीज कमी असतात. मोलासेस (Molasses) नावाचा घटक असतो. यामुळे चयापचय (Metabolism) वाढण्यास मदत होते. यात अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करत असल्यास आपल्या आहारात ब्राउन शुगरचा समावेश करायला हवा. ब्राउन शुगर एक साधारण कार्बोहायड्रेट असतं. ते लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे शारीरिक ऊर्जा मिळवायची असल्यास आहारात ब्राउन शुगर असावी.
पचण्यासाठी उत्तम, बद्धकोष्ठतेवर प्रभावी
ब्राउन शुगर पचण्यासाठी अतिशय उत्तम आहे. पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेशी निगडित समस्या आहेत, त्यांनी ब्राउन शुगरचं सेवन करायला हवं. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा ब्राउन शुगर आणि आल्याचा (Ginger) रस करून प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. महिलांना मासिक पाळीत अनेकदा क्रॅम्प (Cramps) येतात. मासिक पाळी येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी ब्राउन शुगरचे सेवन केल्यास पोटदुखी, क्रॅम्पपासून सुटका मिळू शकते.
विशेष म्हणजे, त्वचा उजळून निघण्यासाठी ब्राउन शुगरचा वापर प्रभावी ठरू शकतो. व्हाइट किंवा ब्राउन शुगर स्क्रबरप्रमाणे वापरून त्वचेवर लावल्यास त्वचेची चांगल्या प्रकारे स्वच्छता राखता येऊ शकते. त्वचेवरच्या निर्जीव पेशी (Dead Cells) नाहीशा करण्यास व त्वचा निरोगी ठेवण्यास ब्राउन शुगरचा उपयोग होऊ शकतो. यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल घटक असल्याने ब्राउन शुगरच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो. बॅक्टेरियाशी लढण्यासाठी शरीराला ब्राउन शुगरमुळे मदत होऊ शकते.