शरीरात कॅल्शियमची कमतरता ठरते घातक; 'या' गंभीर समस्यांचा धोका, वेळीच व्हा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 06:55 PM2024-07-29T18:55:36+5:302024-07-29T19:03:40+5:30
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो.
कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे असं बहुतेक लोकांना वाटतं, पण तसं नाही. कॅल्शियम हाडांपासून मेंदूपर्यंत काम करतं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय होईल? यामुळे हाडांव्यतिरिक्त इतर अवयवांवर कसा परिणाम होतो?, याविषयी जाणून घेऊया...
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, आपल्या शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडांमध्ये असतं, परंतु रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा या स्थितीला हायपोकॅल्सीमिया असं म्हणतात. ही एक धोकादायक स्थिती आहे, कारण यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. सामान्यत: कॅल्शियम हे अन्नपदार्थातून मिळतं, परंतु काही वेळा खाण्या-पिण्यातून पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यास डॉक्टर सप्लिमेंट्सही देतात. यामुळे कॅल्शियमची लेव्हल नीट ठेवण्यास मदत होते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू दुखणं, प्रचंड थकवा येणं, नखं आणि केस कमकुवत होणं, हाडं दुखणं आणि ब्रेन फॉग अशी लक्षणं दिसू लागतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता असल्यास लोकांना चक्कर येऊ लागते आणि हाडांशी संबंधित ऑस्टिओपोरोसिस हा आजार होऊ शकतो. हा असा आजार आहे ज्यामुळे लोकांचे शरीर खूप कमकुवत होतं आणि त्यांना चालायला त्रास होऊ लागतो. या आजारावर कोणताही अचूक उपचार नाही.
कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, दूध, दही, चीज, दही, ताक यासह सर्व दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केलं पाहिजे. दूध हा कॅल्शियमचा चांगला सोर्स मानला जातो. याशिवाय हिरव्या भाज्या, कडधान्ये, बदाम, चिया सीड्स, तीळ, खसखस यासह अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असतं. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.