हिरवा कफ झाल्यावर अॅंटी-बायोटिक्स घ्यावे की नाही? डॉ. नेने यांनी दिला खास सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:23 AM2024-09-24T11:23:10+5:302024-09-24T11:23:46+5:30
Green Mucus : डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अॅंटी-बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे.
Green Mucus : वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी-खोकला होणं तर कॉमनच आहे. पण एक समस्या सगळ्यात जास्त त्रास देते ती म्हणजे कफ. याने छातीत समस्या होते. हिरवा कफ आल्यावर तर लोक आणखीनच घाबरतात. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अॅंटी-बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे.
का होतो हिरवा कफ?
आपल्या श्वसननलिकेत जेव्हा एखादं इन्फेक्शन किंवा सूज होते, तेव्हा कफ तयार होतो. सामान्यपणे कफाचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असतो. पण जेव्हा इन्फेक्शन जास्त होतं तेव्हा कफ हिरवा आणि घट्ट होतो. हिरवा कफ याचा संकेत देतो की, शरीर इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी तयार करत आहे.
हिरवा कफ असल्यावर अॅंटी-बायोटिक्स गरजेचे?
डॉ. नेने यांनी याबाबत सांगितलं की, हिरव्या कफाचा अर्थ नेहमीच बॅक्टेरिअल इन्फेक्शन होत नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, हिरवा कफ झाल्यावर त्यांना अॅंटी-बायोटिक्सची गरज आहे. पण हा मोठा गैरसमज आहे.
डॉ. नेने यांनी सांगितलं की, जास्तीत जास्त केसेसमध्ये हिरवा कफ वायरसमुळे होतो. जसे की, सर्दी किंवा फ्लू आणि वायरसवर अॅंटी-बायोटिक्सचा काहीच प्रभाव होत नाही. अशात केवळ कफाच्या रंगावरून अॅंटी-बायोटिक्स घेण्याचा निर्णय घेणं योग्य नाही.
कफ दूर करण्याचे उपाय
- दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
- आराम करा आणि शरीराला इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी वेळ द्या.
- हलक्या गरम गोष्टी म्हणजे सूप, आल्याचा चहा, तुळशीचा चहा याने कफ पातळ होतो.
- रोज सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.