घरात बसून तासनतास ऑफिसचं काम करता?; तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:00 PM2021-07-05T17:00:20+5:302021-07-05T17:01:32+5:30

कामाचे वाढते तास आणि त्यामुळे येणारा अतिरिक्त ताण ठरतोय जीवघेणा

can working long hours affect your heart know what doctors say | घरात बसून तासनतास ऑफिसचं काम करता?; तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका

घरात बसून तासनतास ऑफिसचं काम करता?; तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका

googlenewsNext

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बऱ्याच जणांना अद्याप कोरोनाचा एकच डोस मिळालेला आहे. त्यामुळे अनेक कार्यालयं सुरू झालेली नाहीत. मुंबईसारख्या शहरांमध्ये सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास मुभा नसल्यानं अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. कार्यालयात ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ वाचत असल्यानं अनेक जण घरातून अधिक वेळ काम करत आहेत. मात्र यामुळे आरोग्याच्या नव्या समस्या निर्माण होत आहेत.

तासनतास काम करणाऱ्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा आणि हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं एका अहवालात म्हटलं आहे. 'जास्त वेळ काम करणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे,' असं अहवाल सांगतो. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एनव्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये (आयएलओ)  यांनी तासनतास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल संशोधन केलं. याबद्दलचा अहवाल इनव्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला.

तासनतास काम केल्यानं २०१६ पासून आतापर्यंत ७ लाख ४५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हृदयाशी संबंधित आजार आणि हृदय विकाराच्या झटक्यानं लाखो कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. कोरोना काळात तर ही समस्या आणखी वाढली आहे. गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अनेक जण कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काम करत असल्यानं स्क्रीन टाईम वाढला आहे. कामाच्या ओझ्याचा सर्वाधिक परिणाम पुरुषांवर होत असल्याचं डब्ल्यूएचओ आणि आयएलओचं संशोधन सांगतं. 

तासनतास काम करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरतं असल्याची बाब संशोधनातून अधोरेखित झाली आहे. 'अधिक काम केल्यानं निर्माण झालेल्या ताणातून मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी पाहता ४५ ते ७४ वर्षे वयोगटाला सर्वाधिक धोका आहे. एकूण मृत्यूंपैकी ७२ टक्के मृत्यू याच वयोगटातले आहेत. आठवड्याभरात ५५ तासांहून अधिक काम करणाऱ्यांना जास्त धोका आहे. कामाचे तास वाढत असताना त्याच बरोबरीनं ताणदेखील वाढत आहे. मानसिक ताणाचा थेट संबंध हृदयाशी येतो. त्यामुळेच अधिक काम करणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याचं प्रमाण जास्त आहे,' असं हैदराबादमधील मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर कुमार नारायण यांनी सांगितलं.

Web Title: can working long hours affect your heart know what doctors say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.