कॅन्सरच्या उपचारानंतर होणारे असह्य दुष्परिणाम आता टळणार, संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 03:03 PM2021-12-03T15:03:20+5:302021-12-03T15:11:05+5:30
आता कॅन्सरच्या उपचाराचे होणार नाहीत दुष्परिणाम. शास्त्रज्ञांना नवा मार्ग सापडला. शास्त्रज्ञांना एक असं जनुक सापडलं आहे, ज्यामुळे हे शक्य होणार आहे.
कल्पना करा, की एखाद्या छोट्या जनुकाला (Gene) लक्ष्य करून कर्करोग (Cancer) बरा झाला तर (Cancer treatment) . सध्याच्या काळात स्तन, प्रोस्टेट, फुफ्फुसं, लिव्हर, मोठं आतडं आदी अवयवांच्या कर्करोगाचं प्रमाण अधिक आहे. कर्करोग जीवशास्त्रज्ञ यिबिन कांग (Yibin Kang) गेल्या १५ वर्षांपासून एमटीडीएच (MTDH) किंवा मेटाडेरिन या अज्ञात परंतु अत्यंत घातक जनुकाचा शोध घेत होते. हे जनुक दोन महत्त्वाच्या कर्करोगांसाठी कारणीभूत ठरतं. याचा वापर नुकताच उंदीर (Rat) आणि मानवी ऊतींवर (Tissue) केला गेला असून, लवकरच मानवावर याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. कर्करोगावर यापेक्षा चांगलं औषध असूच शकत नाही, असं मॉलिक्यूलर बायोलॉजीचे प्राध्यापक कांग यांनी म्हटलं आहे.
मानवामधील जवळपास सर्व प्रकारच्या कर्करोगामध्ये एमटीडीएच महत्त्वाची भूमिका बजावतं. सामान्य ऊतींसाठी हे जनुक महत्त्वाचं नसल्यानं त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हे जनुक कर्करोगावर खूप प्रभावी आहे. केमोथेरपी (Chemotherapy) आणि इम्युनोथेरपीसह (Immunotherapy) ते अधिक प्रभावी ठरू शकतं, असं जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात लिहिण्यात आलं आहे. मेटास्टॅटिक कर्करोग (Metastatic Cancer) प्राणघातक असला, तरी तो कसं कार्य करतो हे शोधून एमटीडीएचसारख्या विशिष्ट जनुकाचा शोध घेऊन त्याला लक्ष्य करणं आणि उपचारांसाठी संवेदनशील बनवणं शक्य आहे. कांग हे मेटास्टॅसिसवर (शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात कर्करोग पसरण्याच्या क्षमतेसाठी वापरला जाणारा शब्द) अभ्यास करीत आहेत. मेटास्टॅसिस (Metastasis) कर्करोगाला अधिक प्राणघातक बनवतो, हे ते जाणतात.
राष्ट्रीय कर्करोग इन्स्टिट्यूटच्या ताज्या आकडेवारीनुसार, स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) झालेले ९९ टक्के रुग्ण योग्य उपचारानंतर जिवंत राहू शकतात. यात केवळ २९ टक्के रुग्ण कर्करोग मेटास्टॅसिस झाल्यावरही जीवित राहू शकतात. मेटास्टॅटिक कर्करोगामुळे अमेरिकेत दर वर्षी ४० हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होतो. हे रुग्ण केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीसारख्या प्रमाणित उपचारांनाही योग्य प्रतिसाद देताना दिसत नाहीत. कांग यांच्या प्रयोगशाळेतले त्यांचे सहकारी आणि दोन्ही अभ्यासाचे लेखक मिन्हांग शेन यांनी सांगितलं, की "आम्ही रासायनिक संयुगांची मालिका शोधली आहे. ही मालिका मेटास्टॅटिक कर्करोगात केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीला रुग्णाचा प्रतिसाद वाढवते. सध्या हा प्रयोग केवळ उंदरांवर करण्यात येत आहे"
"तुमच्यासमोर दोन रुग्ण आहेत आणि दोघांचाही कर्करोग प्रारंभिक अवस्थेत आहे; पण दोघांमध्ये आढळणारी लक्षणं पूर्णपणे भिन्न आहे, ही खूप आश्चर्यकारक बाब म्हणता येईल. जोपर्यंत आम्हाला याचं कारण सापडत नव्हतं तोपर्यंत आम्ही संशोधन सुरूच ठेवलं", असं कांग यांनी सांगितलं.
२००४ मध्ये कांग यांनी प्रिन्स्टनला भेट दिली तेव्हा उंदरांच्या स्तनातल्या गाठीमध्ये प्रथमच एमटीडीएच आढळून आला. कांग यांनी 2009 मध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये एमटीडीएचकडे लक्ष वेधलं. एमटीडीएच प्रोटीन (Protein) सामान्य प्रोटीनच्या तुलनेत असामान्य वेगानं वाढतं, असं यात दिसून आलं. मेटास्टॅसिससाठी हेच कारणीभूत ठरत असल्याचं ट्यूमरच्या ३० ते ४० टक्के नमुन्यांमध्ये दिसून आलं. ज्यावेळी या जनुकाचा शोध लागला त्यावेळी हे जनुक नेमकं कसं काम करतं याविषयी फारशी माहिती कोणालाही नव्हती; मात्र या जनुकाविषयी थोड्याफार प्रमाणात माहिती उपलब्ध होती, असं कांग यांनी सांगितलं.
हे इतर कोणत्याही मानवी प्रोटीनशी साम्य दाखवत नाही. या पथकानं सातत्यानं यावर संशोधन करून २०१४ मध्ये पेपरची एक मालिका प्रसिद्ध केली. त्यात एमटीडीएच हा कर्करोग वाढीसाठी आणि मेटास्टॅसिससाठी कारणीभूत ठरतो, असं आढळलं होतं. उंदरांमध्ये हे जनुक विकसित होतं. यावरून असं दिसून येतं की या जनुकामुळे सामान्य जीवनात कोणताही अडथळा निर्माण होत नाही.
एमटीडीएचच्या क्रिस्टल स्ट्रक्चरवरून (Crystal Structure) असं दिसून आलं की या प्रोटीनची रचना दोन बोटांच्या आकृतीसारखी असते आणि हे एसएनडी 1 (SND1) या दुसऱ्या प्रोटीनवर अवलबूंन असतात. अशाप्रकारे एसएनडी1 सोबतचे त्याचे संबंध तोडल्यास एमटीडीएचचे धोकादायक परिणाम नष्ट करतात येतात.
एमटीडीएचमध्ये दोन प्रमुख यंत्रणा असतात. या यंत्रणा गाठ वाढताना किंवा केमोथेरपी उपचारादरम्यान लोकांना अनुभवास येणाऱ्या तणावापासून संरक्षण करतात. खरं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती अशा प्रकारे तयार केली आहे, की एखाद्या पेशीवर हल्ला झाला आहे हे समजलं नाही तर ती त्यासाठी मदत करू शकत नाही. ज्या मार्गानं रोगप्रतिकारशक्तीला धोक्याचे संकेत मिळत असतात एमटीडीएच–एसएनडी1 तोच मार्ग रोखून धरण्याचं काम करतात. या औषधाच्या मदतीनं अलार्म सिस्टीम सक्रिय करता येते. यामुळे केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचा अधिक परिणाम दिसून येऊ शकतो. हा स्वतः विषारी नसल्यानं त्याचे दुष्परिणामही नसतात. याचा परिणाम एका विशिष्ट कर्करोगावर न होता सर्व प्रकारच्या कर्करोगावर होताना दिसतो, असं कांग यांच्या पथकाला आढळून आलं.