गुप्तांगालाच झालेला कॅन्सर, सर्जरीनंतर डॉक्टरांनी नवीन लिंग केले ट्रान्सप्लांट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 05:47 AM2023-02-26T05:47:27+5:302023-02-26T05:47:56+5:30
राजस्थानमध्ये पहिल्यांदाच हातावर लिंग बनवून त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
जयपूर : वैद्यकीय शास्त्राच्या या युगात काहीही अशक्य नाही. राजस्थानमधील जयपूरमध्ये डॉक्टरांनी एक जटिल शस्त्रक्रिया केली. रुग्णाचे कर्करोगग्रस्त लिंग काढून त्याजागी नवीन लिंगाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
राजस्थानमध्ये पहिल्यांदाच हातावर लिंग बनवून त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. जयपूरमधील भगवान महावीर कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. बुंदी येथील ७२ वर्षीय रुग्णाने उपचारादरम्यान आपले कर्करोगग्रस्त लिंग हटवावे लागणार हे समजल्यावर उपचारास नकार दिला होता. पण, नंतर प्रत्यारोपणाबाबत समजावून सांगितल्यावर ते तयार झाले, असे सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
सर्वप्रथम डॉक्टरांच्या पथकाने रुग्णाचे कर्करोगग्रस्त लिंग काढून टाकले. नंतर रुग्णाच्या डाव्या हाताची त्वचा, रक्तवाहिन्या आणि नसा घेऊन नवीन लिंग बनवले. त्यानंतर मायक्रोस्कोपिक तंत्राच्या सहाय्याने नवीन लिंगाचे प्रत्यारोपण करण्यात आले. हे ऑपरेशन मायक्रो सर्जिकल तंत्राने करण्यात आले.
लिंगामध्ये संवेदना, मूत्रमार्ग आणि आकार निर्माण करणे हे डॉक्टरांसाठी नेहमीच मोठे आव्हान असते. आता व्यक्ती नवीन लिंगासह सामान्य जीवन जगू शकते. सोशल मीडियावर या घटनेची चर्चा आहे.